मालवण पत्रकार समितीचा उद्या पुरस्कार वितरण सोहळा
माजी खासदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
अमित खोत, संदीप बोडवे यांसह परेश सावंत होणार सन्मानित
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका पत्रकार समितीच्या सन २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण उद्या गुरुवारी ५ जानेवारी सकाळी १०.३० वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील सभागृहात होणार आहे. पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, माजी खासदार तथा दैनिक प्रहार संचालक निलेश राणे, प्राचार्य एस. ए. ठाकूर, साहित्यिका सौ. मेघना जोशी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
गेली काही वर्षे पत्रकार दिन (६ जाने) पूर्वसंध्येला मालवण पत्रकार समितीच्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. त्यानुसार २०२२ यावर्षीचे पत्रकार पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. यात मालवण पत्रकार समितीच्या वतीने दिला जाणारा सन २०२२ या वर्षासाठीचा कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अमित खोत यांना जाहीर झाला आहे. तर कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार परेश सावंत यांना तर मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवार्ड पुरस्कार संदीप बोडवे यांना जाहीर झाला आहे.
मालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पुरस्कार वितरणासह जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार मानकरी तसेच चिरेखाण संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गावडे, मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मोठ्या मतांनी विजयी होत संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेले कृष्णा ढोलम व चौके ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होत उपसरपंच झालेले पी. के. चौकेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. अशी माहिती पत्रकार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष संतोष गावडे, सचिव कृष्णा ढोलम यांनी केले आहे.