भाजयुमोने आवाज उठवल्यामुळेच मालवण न. प. च्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती !

मंदार केणी, यतीन खोत यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये ; विजय केनवडेकर यांचा सल्ला

व्यायामशाळेतील एक, दोन वस्तू खराब असणे ठीक, पण संपूर्ण साहित्यच निकृष्ट कसे ? या निकृष्ट साहित्याच्या उदघाटनाची आमदारांना घाई का होती ?

भाजपा नेते निलेश राणे यांना घेऊन व्यायामशाळेतील साहित्याची पुन्हा पाहणी करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी देण्यात आला. या साहित्यातील एक- दोन वस्तू खराब असतील तर ही बाब समजण्या सारखी होती. मात्र सर्वच्या सर्व साहित्य सदोष असणे म्हणजे या संपूर्ण ठेक्यातच गोलमाल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. संपूर्ण साहित्य सदोष असताना आमदार वैभव नाईक यांनी या साहित्याचे उदघाटन करण्याची घाई का केली ? उदघाटनानंतर व्यायामशाळेतील व्यायामपट्टूनी भाजयुमोकडे तक्रार केल्यानंतर भाजयुमोने आवाज उठवताच हे साहित्य खराब असल्याची कबुली देत तातडीने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी आम्ही आवाज उठवला नसता तर हे खराब साहित्य नागरिकांच्या माथी मारण्याचा डाव होता. त्यामुळे दुरुस्त करून आलेल्या साहित्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मंदार केणी आणि यतीन खोत यांनी करू नये, असा सल्ला भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिला आहे. लवकरच भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह या ठिकाणी पाहणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मालवण पालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती करून आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या मंदार केणी आणि यतीन खोत यांच्याकडून त्याचे श्रेय घेण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. मालवण नगरपालिकेतील व्यायामशाळेतील साहित्याच्या त्रुटी दूर करून ते पुन्हा व्यायामशाळेत बसविण्यात आले असल्याची माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी देत आहेत. ज्यावेळी व्यायामशाळेचे साहित्य बसविण्यात आले व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत उद्घाटन केले, तेव्हा हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे हे न पाहताच उद्घाटन का केले, याचे पण उत्तर केणी यांनी जनतेला दिले पाहिजे. व्यायामशाळेचे साहित्य उद्घाटन झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा मार्फत साहित्य पाहण्यास गेले असता या साहित्यावर व्यायामपटू व्यायाम करण्यास तयार नव्हते. या साहित्यावर व्यायाम करता अपघात होण्याची शक्यता दाट होती. याची विचारणा मुख्याधिकारी यांना करता हे साहित्य अजूनही मालवण नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेले नाही त्यामुळे आम्ही या साहित्यात जबाबदार नाही, असे उत्तर देण्यात आले होते. असे असताना अधिकाऱ्यानाच डावलुन उद्घाटन करणे बरोबर होते का ? असं सवाल विजय केनवडेकर यांनी केला आहे.

निकृष्ट व्यायाम साहित्याबाबत भाजपा नेते निलेश राणे यांच्या कानावर गोष्ट घालता त्यांनी तातडीने व्यायामशाळेत भेट दिली. ही भेट उद्घाटन झाल्यानंतर चार दिवसांनी दिली होती. प्रत्यक्ष पाहता व्यायामशाळेमध्ये साहित्यच नव्हते. यासंबंधी नगरपालिकेला विचारणा करता कोणी उत्तर देऊ शकत नव्हते. साहित्याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे नगरपालिकेचे इंजिनियर सांगत होते. मग उद्घाटन केलेले साहित्य गायब कसे झाले, साहित्याचे काय झाले, अशी विचारणा सिंधुदुर्ग नियोजन अधिकाऱ्यांना करता त्यांना उत्तर देता आले नाही. व्यायामशाळेतील व्यायामपटूंनी हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने हे साहित्य ठेकेदाराने परत नेले आहे असे सांगण्यात आले. यासंबंधी निलेश राणे यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचे तसेच नियोजन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता व तक्रार केली असता यासंबंधी ठेकेदाराची चौकशी करण्यात आली. हे साहित्य ठेक्यात असल्याप्रमाणे त्यात दिलेल्या गेजचे सामान आपण ताबडतोब पंधरा दिवसात लावून देतो असे सांगितले होते. असे न झाल्याने ठेकेदाराची पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करता याची चौकशी करण्यात आली. यासंबंधी पाठपुरावा केल्यानंतरच ठेकेदाराने हे साहित्य व्यायामशाळेत आणून लावले आहे. २५ लाख रुपये किमतीचे हे साहित्य कोणतेही खातरजमा न करता त्याचे उद्घाटन करणे हे बरोबर होते का ? कामांचे श्रेय घेण्यासाठी ही नौटंकी करण्याची जरुरी होती का ? असा सवाल करून व्यायामशाळेतील बसवलेले साहित्य पूर्ण बोगस असणे म्हणजे ही फसवणूकच होती. एका दुसरे साहित्य बरोबर नाही हे मान्य करता आले असते. पण असे न होता १०० % बोगस काम म्हणजे या ठेक्यातच पूर्ण गोलमाल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भाजयुमोने आवाज उठवला नसता तर हे निकृष्ट दर्जाचे साहित्य मालवणच्या जनतेच्या माथी मारले असते. तरी मंदार केणी व यतीन खोत यांनी श्रेय घेऊ नये, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!