कुडाळमध्ये भरवस्तीत गॅस पुरवठा करणारे स्टेशन ; नगरपंचायतीचीही परवानगी नाही
भाजपा गटनेते विलास कुडाळकर यांचा आरोप ; जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
कुडाळ : कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने कुडाळ नगरपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता गॅस पुरवठा करणारे स्टेशन उभारले आहे. भर लोकवस्ती आणि जवळ असलेल्या शाळा, मंदिर या परिसरात हे स्टेशन उभारले असून भविष्यात याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना याबाबत कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले असल्याची माहिती कुडाळ नगरपंचायत मधील भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी भूमिका मांडावी आणि या स्टेशनबाबत निर्णय घ्यावा. असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री. कुडाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने यापूर्वी पाईपलाईन टाकली आहे. ही पाईप लाईन टाकताना नगरपंचायतीची परवानगी घेऊन नगरपंचायतीला नुकसानीची रक्कमही अदा केली आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी जर नगरपंचायतीची परवानगी लागत असेल तर गॅस पुरवठा करणारे स्टेशन उभारताना नगरपंचायतीची परवानगी का घेतली गेली नाही? याबाबत जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दि. १६ डिसेंबर २०२२ तर जिल्हाधिकारी यांना दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी या अनधिकृत उभारलेल्या गॅस पुरवठा स्टेशनबाबत पत्र देण्यात आले आहे.
मुळात लक्ष्मीवाडी येथील ओहोळाच्या बाजूला आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला हे स्टेशन उभारण्यात आले आहे. या स्टेशन पासून मंदिर तसेच लोकवस्ती आणि बॅ. नाथ पै विद्यालय व प्राथमिक शाळा जवळ आहेत. अशा गजबजणाऱ्या ठिकाणी गॅस पुरवठा करणारे स्टेशन हे कोणत्या नियमांच्या अधीन राहून देण्यात आले आहे. नगरपंचायतीची या स्टेशनला कोणतीही परवानगी नसल्याची माहिती उघड झाली आहे. पण हे स्टेशन अनधिकृतपणे सुरू होते हे नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाला माहीत नव्हते का? एवढे दिवस या स्टेशनचे काम सुरू आहे त्याला एकही नोटीस नगरपंचायतीकडून देण्यात आली नाही. म्हणजे कोणाच्या वरदहस्ताने धोकादायक असणाऱ्या गॅस पुरवठा स्टेशनचे काम सुरू होते. हा सुद्धा एक प्रश्न आहे. यामध्ये सत्ताधारी गप्प का राहिले? यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्या आहेत का? असा सवालही निर्माण होत आहे. या ठिकाणच्या नागरिकांना अंधारात ठेवून गॅस पुरवठा स्टेशन उभारण्यात आले. भविष्यात या गॅस स्टेशनमुळे धोका निर्माण होऊ शकतो. आजूबाजूच्या लोकवस्तीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते तसेच शाळा, मंदिर या ठिकाणी सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत विचार करून भूमिका ठरवावी असेही विलास कुडाळकर यांनी म्हटले आहे.
‘त्या’ आंदोलनाची झाली आठवण
कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये कचरा डेपो होता आणि या कचरा डेपोमधून होणारे प्रदूषण आणि लोकवस्तीला होणारा त्रास या विरोधात तत्कालीन नगरसेवक सचिन काळप यांनी आंदोलन छेडले होते. आणि हा डेपो हलविण्यात आला होता. आता कचरा डेपो पेक्षा घातक असलेले गॅस पुरवठा करणारे स्टेशन लक्ष्मीवाडीमध्ये होत आहे. मात्र कोणी याबाबत एक शब्दही काढत नाही हे दुर्दैव आहे. त्या आंदोलनाप्रमाणे या गॅस स्टेशनच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठवावा असे आवाहनही विलास कुडाळकर यांनी केले आहे.