निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेनंतर हातिवले मधील टोल वसुली स्थगित
अधिकारी नरमले ; ठिय्या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह हजारो राजापूरवासियांचा पाठिंबा
राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर कोकणात कुठेही टोल वसुली सुरू नसताना राजापूर तालुक्यात हातिवले येथील टोलनाक्यावर ठेकेदाराकडून बुधवारी अनधिकृतपणे टोल सुरू करण्यात होता. या टोल वसुलीच्या विरोधात गुरूवारी भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय राजापूरवासियांनी छेडलेल्या ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत टोल वसुलीला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम पुर्ण होत नाही, इथल्या स्थानिक जनतेचे प्रश्न सुटत नाहीत आणि पुढील बैठकीत टोल विषयी धोरण निश्चीत होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थीतीत टोल वसुल करू दिला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती.
राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाक्यावर टोल विरोधी सर्वपक्षीय आंदोलनाचे नेतृत्व करत निलेश राणे यांनी अनधिकृतपणे सुरू असलेली टोल वसुली थांबविण्यास महामार्ग प्रशासनाला भाग पाडले. निलेश राणे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा करताच उपस्थीत सर्वपक्षीय मंडळींनी एकच जल्लोष करत निलेश राणे यांच्या नावाचा जयघोष केला. हमारा नेता कैसा हो..निलेश राणें जैसा हो, निलेश राणे आगे बढो..हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणानी परिरसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना निलेश राणे म्हणाले की, आपण टोलच्या विरूध्द नसून अनधिकृत टोल वसुलीच्या विरोधात आहोत. अजुन राजापूर तालुक्यातच महामार्गाचे काम अपुरे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड पर्यंतचे काम अदयापही झालेले नाही. काही प्रमाणात पोलादपूरात अपुरे आहे. रायगडमध्ये काम अजून पुर्ण झालेले नाही. असे असताना फक्त टोल हा राजापूर तालुक्यातच सुरू करण्यात का येत आहे, याची विचारणा करण्यासाठी आणि टोल वसुलीसाठी थांबविण्यासाठी मी इथे आलो. तुमचं काम पुर्ण करा आणि मगच टोल वसुल करा ही आपली मागणी आपण अधिकाऱ्यांकडे केली. त्याप्रमाणे संबधीत अधिकारी आणि मंत्रीमहोदयांनी ती मान्य करताना टोल वसुलीला स्थगिती दिलेली आहे. याबाबत पुढची बैठक संबधित अधिकारी यांचे समवेत आपण सर्वपक्षीय मंडळींसमवेत होईल. यामध्ये जो काही तोडगा निघेल. त्यानंतरच टोल आकारला जाईल. मात्र तोपर्यंत या विषयाला स्थागिती राहिल. तरीही कोणत्याही परिस्थीतीत महामार्गाचे काम पुर्ण न करता जर कोणी अनधिकृत टोल वसुलीचा प्रयत्न करत असेल, अन्याय करणार असेल आणि पुन्हा रस्त्यावर उतरावं लागत असेल तेव्हा आणि जेव्हा जेव्हा या विषयासाठी यावं लागेल, तेहा तुम्ही हाक दया मी हाकेला ओ.. दयायला तुमच्यासाठी सदैव तत्पर असेन अशा शब्दात निलेश राणे यांनी उपस्थीतांना आश्वस्थ केले. यावेळी निलेश राणे यांचा विजय असो.. असा नारा देत आंदोलकांनी टोल नाका दणाणून सोडला.
सर्वपक्षीय यांची साथ, शिवसेना ठाकरे गटाची मात्र पाठ
महामार्गावर हातिवले येथे जवळपास तीन तास हे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, वाहनचालक, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. अन्यायकारक टोल वसुली थांबवावी अशी सर्वांची आग्रही मागणी होती. या आंदोलन विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले असताना नेहमीच्या जनतेच्या प्रश्नावंर मुग गिळून बसणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मात्र सोयीस्कर पाठ फिरविली याची एकच चर्चा सुरू होती.
मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण असल्याने तसेच शेतकरी व जमीन मालकांचे प्रश्न पलंबित असताना टोल वसुली करण्यात येवू नये अशी समस्त राजापूर वासीयांची मागणी असताना बुधवारपासून हातिवले येथील टोलनाक्यावर टोलवसुलीला अचानक सुरूवात झाल्याने आकमक झालेल्या राजापूरातील सर्व पक्षीय नागरिकांनी टोलनाक्यावर धडक देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. तर अनधिकृतपणे सुरू झालेल्या टोलवसुलीबाबत निलेश राणे यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी या ठिकाणी येण्याचे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे गुरूवारी ११ वाजता निलेश राणे आंदोलन स्थळी दाखल झाले. तत्पुर्वी माजी आमदार ऍड. हुस्नबानू खलिफे यांसह, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांसह सर्वपक्षीय नागरिक, व्यवसायीक, व्यापारी उपस्थित होते. या ठिकाणी राणे यांनी उपस्थित महामार्ग अधिकारी व्ही. एल. पाटील यांच्याशी अनधिकृतपणे होत असलेल्या टोल वसुलीबाबत विचारणा केली. व ही टोल वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा आम्ही टोल बंद पाडू अशी भूमिका मांडली. त्यावर पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सांगतो. असे सांगितले. त्यासाठी निलेश राणे यांनी वेळ दिला. मात्र बराच अवधी जावूनही सकारात्मक् प्रतिसाद न मिळाल्याने निलेश राणे आक्रमक पवित्रा घेतला. टोल वसुलीसाठी थांबलेल्या बाहेरील वाहनांना मार्गस्थ करताना अनधिकृतपणे सुरू असलेली फास्ट टॅग यंत्रणा बंद पाडण्यास भाग पाडले. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली माने, तहसिलदार शितल जाधव घटनास्थळी दाखल झाल्या. निलेश राणे यांनी त्यांच्याशीही संवाद साधला. अनधिकृतपणे सुरू असलेली ही टोल वसुली थांबविण्याबाबत विनंती केली. मात्र सल्लामसलतीसाठी अधिकाऱ्यांनी वेळकाढु धोरण अवंलबिल्याने निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत निर्वाणीचा ईशारा दिला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदेरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर थेट बोलणं करून दिले. निलेश राणे यानी पंदेरकर यांच्याशी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत टोल वसुलीला स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर हे ठियया आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी माजी आमदार ऍड. सौ. हुस्नबानू खलिफे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, माजी नगराध्यक्ष अड. जमीर खलिफे, अरविंद लांजेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, दिपक बेंद्रे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, शिंदे गट शिवसेनेचे शहर अध्यक्ष सौरभ खडपे, राजा काजवे, प्रसाद देसाई, ओंकार देसाई, अनामिका जाधव, भरत लाड, शितल पटेल, जगदीश पवार, विदयाधर राणे, विनायक कदम, पंढरीनाथ आंबेरकर, विजय हिवाळकर, मनोज सप्रे, अमजद बोरकर, नाटे सरपंच, संदीप बांदकर, समीर खानविलकर, चंद्रकांत शिंदे, बाळु गोटम, सुहास बोरकर, श्री. बाबू सरफरे, प्रकाश भिवंदे, जितेंद्र खामकर, मंदार सप्रे, प्रकाश कातकर, कैलास कोठाकर, कृषणा नागरेकर, प्रकाश तांबट, मोहन पाडावे, पांगरे सरपंच सौ. वैष्णवी कुळये, धनंजय पाथरे, मुन्ना खामकर, संजय यादव, रविकांत भामत, मधुकर ठाकूर, प्रल्हाद तावडे, संतोष धुरत, शीळ सरपंच अशोक पेडणेकर, महाजन, प्रशांत मराठे, मोहन घुमे, मंदार कानडे, मंदार ढवळे, प्रशांत सावंत, संजय कपाळे, जिलानी काझी, प्रशांत जोशी, रविंद्र बावधनकर, समीर शिंदे, आसिफ डोसानी, संदेश आंबेकर, अमर वारिशे, सुनिल भणसारी आदींसह बहुसंख्य सर्वपक्षीय नागरिक, व्यापारी, ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी, चिरेखाण संघटनेचे पदाधिकारी, टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.