वरची गुरामवाडी ग्रा. पं. च्या “हाय होल्टेज” लढतीत निष्ठेचा विजय ; मतदारांनी बंडाखोरीला नाकारले

सरपंच निवडणुकीत भाजपच्या शेखर पेणकर यांच्याकडून बंडखोर सतीश वाईरकर यांना पराभवाचा धक्का ; ग्रा. पं. मध्येही भाजपला बहुमत

बंडखोर गटाच्या विद्यमान उपसरपंच मकरंद सावंत यांच्यासह तीन ग्रा. पं. सदस्यांचाही पराभव

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा मधील बंडखोरीमुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या लढतीत मतदारांनी निष्ठेला महत्व देत भाजपच्या शेखर पेणकर यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. भाजपमध्ये बंडखोरी करून शिवसेनेसोबत गाव पॅनल मधून सरपंच पदासाठी रिंगणात उतरलेल्या माजी उपसरपंच सतीश वाईरकर यांचा 294 मतांनी पराभव झाला. या ग्रा. पं. मध्ये भाजपने सरपंच पदासह सदस्यांच्या निवडणुकीतही वर्चस्व राखले आहे. ही निवडणूक माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. सरपंच पदासह ग्रा. पं. वर वर्चस्व मिळवून साटविलकर यांनी आपण वरची गुरामवाडी ( कट्टा) गावच्या राजकारणातील किंगमेकर असल्याचे दाखवून दिले आहे. वाईरकर गटाचे विद्यमान उपसरपंच मकरंद सावंत यांच्यासह विद्यमान तीन ग्रा. पं. सदस्यांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे.

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची होती ती भाजपचे बंडखोर सतीश वाईरकर यांच्या उमेदवारीमुळे ! भाजपा सोबत मागील दहा वर्षे सत्ता उपभोगलेल्या सतीश वाईरकर यांनी पुन्हा एकदा सरपंच पदाच्या महत्वाकांक्षेने भाजप सोबत बंडाखोरी करून शिवसेना ठाकरे गटासोबत हातमिळवणी केली. काही ग्रा. पं. सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत गाव पॅनल तयार करून भाजप समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. श्री. वाईरकर हे यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. ना. राणे यांच्या माध्यमातून स्थानिक भाजपा नेते माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी त्यांना यापूर्वी वरची गुरामवाडी ग्रा. पं. चे उपसरपंच पद दिले. तर मागील ग्रा. पं. निवडणुकीत त्यांच्या पत्नीला पाच वर्षे सरपंच पद देण्यात आले होते. मात्र त्यांनी भाजपा चे अधिकृत उमेदवार शेखर पेणकर आणि पॅनल विरोधात बंडखोरी केल्याने संतोष साटविलकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजपच्या ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करून गावची एकी आणि निष्ठा दाखवून दिल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत बंडखोर सतीश वाईरकर यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या बरोबरीने ग्रा. पं. सदस्याच्या रिंगणात उतरलेल्या तीन विद्यमान ग्रा. पं. सदस्यांना देखील पराभूत व्हावे लागले आहे. यामध्ये विद्यमान उपसरपंच मकरंद सावंत तसेच गणेश वाईरकर, रुपाली परुळेकर यांचा समावेश आहे.

या ग्रा. पं. मध्ये भाजपा पुरस्कृत पॅनल ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याठिकाणी धोंडी गोविंद कामतेकर, विद्या सुभाष गिरकर, संपदा अमोल वालावलकर, विलास मोहन बांदेकर, मयुरी सूर्यकांत कुबल यांच्यासह प्रशांत श्रीकृष्ण टेंबुलकर, वंदेश मच्छिंद्र ढोलम, सुप्रिया संदीप गुराम आणि श्रद्धा संजय गुराम हे ग्रा. पं. सदस्य विजयी झाले आहेत. या निकालामुळे वरची गुरामवाडी येथील जनता निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या पाठीशी राहिल्याचे स्पष्ट झाले असून माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर हेच येथील राजकारणातील किंगमेकर असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!