वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; सरपंच भाई ढोके कार्यकर्त्यांसह भाजपात !

ग्रा. पं. निवडणुकीतील भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांचे पारडे जड

आमच्या कुटुंबात आलात, आपला योग्य तो मान सन्मान राखला जाईल ; निलेश राणेंचा शब्द

मालवण | कुणाल मांजरेकर

वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी उपसरपंच संदेश तळगावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्या नंतर आज सरपंच घन:श्याम उर्फ भाई ढोके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. श्री. राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. आमचा पक्ष म्हणजे एक कुटुंबं आहे, आमच्या कुटुंबात नवे जुने असा भेदभाव नाही, आजपासून तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुमचा पक्षात योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात भाजपाने यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निमित्ताने जोरदार शिरकाव केला आहे. या ग्रामपंचायती वरील ठाकरे सेनेची सत्ता उलथाऊन टाकण्यासाठी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या विश्वासू शिलेदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजपाला यश आले आहे. आज वायरी भूतनाथचे सरपंच भाई ढोके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. गावचा विकास हिच आपली एकमेव मागणी असल्याचे भाई ढोके यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी माजी उपसरपंच संदेश तळगावकर यांनीही आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला होता. अलीकडे वायरी भूतनाथ विभागात भाजपने घेतलेले प्रवेश विचारात घेता ठाकरे सेनेचा बुरुज यंदाच्या निवडणुकीत ढासळणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या प्रवेशामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासह आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना जोरदार धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे वायरी भुतनाथ गावात भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना झाड यांच्या विजयाचे पारडे जड झाल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दाजी सावजी, दीपक पाटकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, पांडुरंग मायनाक, संदेश तळगावकर, राकेश सावंत, निषय पालेकर, रवी मालवणकर, दादू डीचवलकर, नितीन तोडणकर, बाबू कदम यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्त्यांमध्ये निखिल ढोके, अखिल ढोके, कमलेश ढोके, सर्वेश ढोके, रमेश सारंग, बाबू खोत, सुजन सागवेकर, नाना ढोके, छगन सावजी, सागर जोशी, विराज परब, यशवंत कोळंबकर, मंदार आडकर, अरुण बटे, प्रशांत तोडणकर, नितीन तोडणकर, कुंदन जोशी आदींचा समावेश आहे.

यावेळी सरपंच घनश्याम ढोके म्हणाले गावचा सरपंच असतानाही होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या माध्यमातून विश्वासात घेतले जात नव्हते. सातत्याने हेच प्रकार घडत असल्यामुळे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत व माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या माध्यमातून आपण नारायण राणे साहेबांशी जोडलेला असायचो. अनेक दौऱ्यात त्यांच्यासोबत होतो. मधला काही काळ मी बाजूला गेलो, मात्र आता पुन्हा जुन्या सहकाऱ्यांसोबत काम करायला मिळणार आहे. समाजासाठी आणि गावासाठी काम करत असताना सुचवलेली विकासकामे व्हावीत, हीच आपली प्रमुख मागणी राहील, असे ढोके यांनी सांगितले.

तुम्ही ग्रामपंचायत आणा ; जी विकासकामे सांगाल ती भाजपच्या माध्यमातून पूर्ण करू : निलेश राणे

आपण सरकारमध्ये आहोत. तुम्ही मागाल ती विकासकामे भाजपच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील. तुम्ही ग्रामपंचायत आणा. गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही भाजपात आलात. आपण एका कुटुंबाचे सदस्य झालो. अशी भावना माजी खासदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!