वरची गुरामवाडीत “काटेंकी टक्कर” ; “गावपॅनल”च्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ !
सरपंच पदासाठी सतीश वाईरकर यांच्यासह नऊही जागांवर गाव पॅनलचे उमेदवार रिंगणात ; प्रचारात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यातील काही गावांमध्ये “हाय हॉल्टेज” लढती पाहायला मिळत आहेत. यातीलच एक ग्रामपंचायत म्हणजे वरची गुरामवाडी अर्थात कट्टा ग्रामपंचायत ! याठिकाणी गावविकास पॅनल विरुद्ध भाजपा पुरस्कृत पॅनल मध्ये कांटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. या लढतीत गाव पॅनलच्या प्रचारात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत असून गाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. या ठिकाणी गाव पॅनलच्या वतीने सरपंच पदासाठी सतीश वाईरकर हे रिंगणात असून आपल्यासह आमच्या पॅनलचे सर्व ९ ही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास श्री. वाईरकर यांनी व्यक्त केला आहे.
सतीश अंकुश वाईरकर हे मागील दहा वर्ष ग्रामपंचायतीच्या राजकारणाशी निगडित आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, प्रभारी सरपंच अशी पदे भूषवली असून त्यांच्या पत्नी सौ. स्वाती सतीश वाईरकर या मागील ग्रा. पं. निवडणुकीत थेट सरपंच म्हणून जनतेतून निवडून आल्या आहेत. श्री. वाईरकर यांनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पॅनल मधून सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर गावपॅनल च्या वतीने प्रभाग १ मधून गणेश रमेश वाईरकर, सुप्रिया संदीप गुराम, श्रद्धा संजय गुराम, प्रभाग २ मधून मकरंद सावंत, सौ. रुपाली परुळेकर, सौ. निशिगंधा चव्हाण, तर प्रभाग ३ मधून सौ. श्रद्धा श्रीकृष्ण मुसळे, मयुरेश अशोक लाड आणि वंदेश मच्छिंद्र ढोलम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गाव पॅनल मधून सदस्य पदासाठी तीन अनुभवी चेहरे देण्यात आले असून सहा नवीन चेहरे या निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांना शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे.
घराणेशाहीच्या विरोधात उमेदवारी ; विजयाचा आत्मविश्वास : सतीश वाईरकर
कट्टा गावात घराणेशाहीला कंटाळलेल्या मतदारांच्या आग्रहाखातर आपण गाव पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या बरोवर अन्य नऊ उमेदवार गाव पॅनलने सदस्य पदासाठी उभे केले असून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील १० वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या बळावर आमच्या संपूर्ण पॅनलचा विजय निश्चित आहे. आज ग्रामपंचायतीला शासनाच्या वतीने थेट निधी येत असून रस्ते, पायवाट अशा विकास कामांसाठी अन्य कोणत्याही निधीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याला गावच्या विकासासाठी झटायचे असून त्यासाठीच आज संपूर्ण गाव एकवटला आहे, असे सरपंच पदाचे उमेदवार सतीश वाईरकर यांनी म्हटले आहे.
गावपॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये रवी गुराम, अनिल गुराम, शिवराम गुराम, संजय गुराम, संतोष देऊलकर, प्रशांत गोठणकर, बाबल गुराम, राम चव्हाण, रणजित कदम, डॉ. गोपाळ सावंत, सौ. श्वेता सावंत, देवदास रेवडेकर, भालचंद्र भोजने, पवन भिसे, बाबू शंकरदास, भालचंद्र काराणे, अमित काराणे, प्रजेश रावले, आनंद रावले, करण गुराम, संकेत तळवडेकर, प्रवीण गुराम, संतोष गुराम, गणेश वाईरकर, राजश्री गुराम, सुगंधा गुराम, सायली जांभवडेकर, नम्रता केळूसकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.