ग्रा. पं. निवडणूकीत तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचा भाजपा उमेदवारांना पाठिंबा
अध्यक्ष सहदेव साळगावकर यांची माहिती ; किनारपट्टीचा पर्यटन विकास नारायण राणेंच्याच माध्यमातून
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्याचा जो पर्यटन विकास झाला आहे, तो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वायरी, तारकर्ली, देवबाग येथील भाजप पुरस्कृत सरपंच व सदस्य पदाच्या सर्व उमेदवारांना तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने पाठिंबा जाहीर केला आहे. अशी माहिती अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी दिली आहे.
तारकर्ली पर्यटन विकास संस्था कार्यकारणी बैठक अध्यक्ष सहदेव साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी बाबा मोंडकर, रवींद्र खानविलकर, मनोज खोबरेकर, अवी सामंत, मिलिंद झाड, स्वप्नील साळगावकर, रोहन रेवंडकर, प्रभाकर वाळवे, दर्शन वेंगुर्लेकर यासह अन्य सदस्य उपस्थित होते. वायरी येथील भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार मनोज झाड, तारकर्ली सरपंच पदाच्या उमेदवार मृणाली मयेकर, देवबाग सरपंच पदाचे उमेदवार रामचंद्र चोपडेकर यासह भाजपा पुरस्कृत सदस्य पदाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाजपा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तिन्ही किनारपट्टी गावांचा अधिकाअधिक विकास होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.