नांदगाव सभेतील “त्या” वक्तव्याशी आपण ठाम : नितेश राणेंचं स्पष्टीकरण
ग्रा. पं. वर ठाकरेसेनेचा सरपंच निवडून आला तर विकास कसा होणार, निधी कसा येणार ? याचं उत्तर आ. नाईक, उपरकरांनी द्यावं
कणकवली नगरपंचायतीला महाविकास आघाडीने निधी दिला नाही, तेव्हा नाईक, उपरकर गप्प का होते ?
कणकवली : कणकवली मतदार संघातील जनतेशी माझं अतुट नातं आहे. मी या मतदारसंघाचा पालक आहे. त्यामुळे मला अधिकारवाणीनं बोलायचा हक्क आहे. नांदगाव येथील सभेत मी योग्य तेच बोललो आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? गावात निधी कसा येणार याचं उत्तर आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी द्यावं असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कणकवली नगरपंचायतीला निधी दिला नाही. मी सुचविलेली कामे डवलली त्यावेळी नाईक, उपरकर गप्प का राहिले? असाही सवाल त्यांनी केला. येथील प्रहार भवन येथे श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आज देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांना तुम्ही जर मतदान केलं नाहीत. तर नेमका तुमच्या गावाचा विकास कसा होणार याचं विश्लेषण माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी द्यावं. गावाचा विकास झालाच पाहिजे अशी भावना मतदारांमध्ये आहे. तो करून घेण्यासाठी मतदार १८ रोजी मतदान होणार आहे. ज्याचं पॅनल, उमेदवार निवडून येतील त्यांनी गावाचे प्रश्न रस्ते, पाणी, वीज, राज्य सरकारचा निधी, केंद्र सरकारचा निधी आणाव्यात. अशी भावना मतदारांची असते, म्हणून ते पॅनेल निवडून देतात. उद्या त्यांनी ठाकरे सेनेचा सरपंच निवडून दिला. तर मला प्रश्न विचारायचा आहे की, ठाकरे सेना पुरस्कृत पॅनेलचा सरपंच निवडून दिलात तर तुमच्याकडे निधी कशी येणार? ते म्हणाले, नांदगाव येथील प्रचार सभेतील माझा मुद्दा राज्यभर अतिशय योग्य पद्धतीने पोचवल्याबद्दल प्रसार माध्यमांच मी आभार मानतो. अशा पद्धतीने अदृश्य मित्र असल्याने आमच्यासाठी काम सोपं होतं. जो मुद्दा मी नांदगाव येथे मांडला. तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ज्या मतदारसंघामध्ये ३० ते ३२ हजार मतांनी निवडून आलो. त्या मतदारसंघात अधिकारवाणीने बोलणं हे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझा हक्क आहे. माझा तो हक्क बजावताना काही गोष्टीची लोकांना जाणीव करून देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही. मी जे बोललो ते मतदारसंघाचा पालक म्हणून बोलण्याचा माझा अधिकार आहे, मतदारांना कशापद्धतीने समजावयचे असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या आणि मतदारसंघाच्या नात्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्या वक्तव्याबाबत मतदारांमध्ये आणि मलाही काही चुकीचं वाटलं नाही. जे काही माझे विरोधक आहेत, मिडीयामध्ये जे शुभचिंतक मित्र आहेत, त्यांना अगर ते चुकीचे वाटलं असेल तर तो त्यांच्या मनोरंजनाचा भाग झालेला आहे. माझ्यामुळे कुणाला प्रसिद्धी मिळत असेल कुणाला पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळत असेल. कुणाला आपल्या मालकांकडून वाहवा मिळत असेल तर मी समाधानी आहे.
आम. नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधक आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे विरोधात आहेत. गेल्या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचं उत्तर त्यांनी त्यावं. ग्रामपंचायतींना ग्रामविकास मंत्रालयामार्फत निधी येतो. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे आहेत. गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते बांधकाम खात्याकडून होतात. हे खातं रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तर सर्व निधी अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून पाठवला जातो. हे खातं देखील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत. श्री.राणे म्हणाले, पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत भाजप पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे नेते माझ्या मतदारसंघावर अन्याय करणार का? मी दिलेली कामांची यादी नाकारणार का? मी एकमेव भाजपचा आमदार असेल तर मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का? पक्ष माझे लाड करणार नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांचे शिवसेनेत असल्यापासून घनिष्ठ संबंध आहेत. ते राणेंच्या मुलाच्या मतदारसंघाला कधीही डावलणार नाहीत. माझ्या एका शब्दाखातर त्यांनी कणकवली नगरपंचायतीला २२ कोटी रूपये दिले. हे मीच आणू शकलो. म्हणून हक्काने बोलण्याचा अधिकार मला आहे. याची जाणीव मी माझ्या मतदारांना करून देत असेल तर त्यात चुकीचं काहीही नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाचा कालावधीत कणकवली मतदारसंघावर महाविकास आघाडीने प्रचंड अन्याय केला. साकव एकही यादी स्वीकारली नाही. रस्ते यादी पाठवली त्याला मंजूरी नाही. मी जिल्हा नियोजनमध्ये नेहमी भांडायचो. पण मी पाठवलेल्या याद्या बदलून टाकायचे. ज्या ज्या नगरपंचायती माझ्याकडे होत्या, त्या नगरपंचायतीसाठी निधी दिला नाही. नीतेश राणेचा मतदारसंघ म्हणून निधी दिला जात नव्हता. त्यावेळी परशुराम उपरकर, वैभव नाईक यांचा चुकीचं काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी उठाव का केला नाही. मी केलेलं वक्तव्य काहीही चुकीचं नाही. माझं मतदारांबरोबर अतुट नातं आहे. मतदार मलाही ओरडतात, आमदार चुकत असतील तर ते जरूर सांगतात. मी हक्काने ते वक्तव्य केलंलं आहे. जे माझ्याकडे ग्रामपंचायती देतील त्या ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. बिनविरोध झालेल्या गावांना मी ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे. ज्यांच्याकडे विकास करण्याची धमक आहे, त्यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी उभं राहावं असंही आवाहन आम. नितेश राणे यांनी केले.