प्रशासकीय राजवटीत मालवण नगरपालिकेचा कारभार खालावला !
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेत मागील वर्षभर प्रशासकीय राजवट सुरु आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे प्रशासक पदाची धुरा देण्यात आली आहे. पण मागच्या वर्षभरात आमच्या कालावधीत सुरु असलेली विकास कामे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादीबाबत कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष होत चालले आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. न. प. निवडणूका न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकाप्रतिनिधिंकडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत. आणि आमची ती नैतिकता पण आहे. त्यामुळे ही कामे न झाल्यास नागरिक आम्हालाच जबाबदार धरणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभाराबाबत माहिती घेऊन आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मालवण शहरातील विकासाच्या विविध १२ मुद्द्यांकडे महेश कांदळगावकर यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये शहर स्वच्छता, बायो टॉयलेट गाड्या, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन व डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोवकांडा पिंपळ येथील बंद अवस्थेतील फाउंटन, बंद हायमास्ट, भाजी मार्केट व मल्टीपर्पज हॉलचे काम बंद, मत्स्यालय व भुयारी गटार योजना, खत निर्मिती मशीन बंद, मासेमार्केट वरील गाळ्यांचा लिलाव नाही या मुद्द्यांचा समावेश आहे.
श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, आमच्या कालावधीमध्ये मागील कित्येक वर्षे साठलेला आडारी डम्पिंग ग्राउंड येथील कचरा उचलून डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्यात आलं होतं, आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी भेट देऊन या स्वच्छतेचं कौतुक केलं होतं, त्याच डम्पिंग ग्राउंडची आजची परिस्तिथी अतिशय खराब आहे. याच ठिकाणी सध्या ७० लाख रुपयांचे कचरा विलगिकरणाचे काम सुरू असताना ही परिस्थिती का उद्भवली हे विचार करण्या सारखे आहे. टेंडरप्रमाणे काम होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वी कचरा टेंडर वर्षाला सुमारे ४० लाख रुपये होते ते आता ७२ लाख एवढे वाढवूनही कचरा संकलनात अजूनही सातत्य येत नसेल तर पैश्याचा अपव्यय होत आहे असे म्हणावे लागेल. भरमसाठ कर्मचारी वाढवण्यात आले पण त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याचं निदर्शनास येत आहे. सध्याचा कचरा ठेकेदार हा गटार खोदाईचा ठेकेदार होता. त्याचे गटार खोदाई काम व्यवस्थित नसल्याने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यास सांगितले होते. असे असताना कारवाई सोडा तर त्यालाच कचऱ्याचे टेंडर मंजूर करण्यात आले. या ठेकेदारा कडून अजूनही कर्मचारी याना पगार, प्रॉव्हिडंट फंड, इतर सुविधा पुरवण्यात येत नसल्याने त्यांच्यावर वारंवार संप करण्याची पाळी येते आणि आता तर त्याने ठेका पण सोडलेला आहे. त्या ठेकेदाराला काम देऊ नये असे सांगूनही त्यालाच ठेका मंजूर केला गेला त्यामूळे सध्या ही परिस्तिथी ओढवली आहे. सध्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमूळे स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. स्वच्छता पुरस्कार मिळण्यासाठी कागदोपत्री सादरीकरण करून आणि एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट केले जातात. पण दर दिवशी कचरा व्यवस्थापन परिस्तिथी काय आहे हे पाहणे त्यापेक्षा महत्वाचं आहे. फक्त स्वच्छतेचे संदेश भिंतीवर रंगवून हे होणार नाही. जर वेंगुर्ल्याचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे हे स्वच्छतेचं काम करून त्या बाबत पुरस्कार मिळवून देतात आणि याची शासन दरबारी दखल घेऊन वेंगुर्ल्याच्या स्वच्छतेबाबतचा धडा शैक्षणिक पुस्तकात येऊ शकतो तर त्याच वर्गवारीत काम करणारे आमचे मुख्य अधिकारी हे का करू शकत नाहीत याचा पण विचार होणे गरजेचे वाटते, असे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
बायो टॉयलेट गाड्या वापरविना ; डास फवारणी, फॉगिंग गाडी बंद
पर्यटकांना सोयीच्या दृष्टीने किनाऱ्यावर बायो टॉयलेटच्या पाच गाड्या घेऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. त्याच्या देखभालीचे टेंडर आमच्या कालावधीत दोन वेळा काढण्यात आले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टेंडर होईपर्यंत ऑफिस मार्फत कामगार घेऊन ते चालवावे याबाबत सूचना करूनही अद्याप त्या गाड्या धूळखात पडल्या आहेत, हे कांदळगावकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आमच्या कालावधीत नवीन सक्शन गाडी घेण्यात आली, पण सध्या अयोग्य नियोजनामूळे पावती केलेल्या नागरिकाकडे तीन चार महिने गाडी पाठवली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. लेखी सूचना करूनही गेले वर्षभर डास फवारणी, फॉगिंग करण्याचे काम बंद आहे. त्यामुळे पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी कडे येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पार्किंगची दुरावस्था ; दिशादर्शफलक चुकीच्या ठिकाणी
मालवण शहरात पर्यटकांचा ओघ बघता भरड नाका या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे ५ कोटी रुपयांचे मल्टीस्टोरेज पार्किंग प्रस्तावित केलं होतं. पण एवढा निधी एका वेळी उपलब्ध होऊ न शकल्याने या ठिकाणी सुमारे २५ लाख रुपये खर्च करून सध्या पार्किंग व्यवस्था करण्यात आली. पण या पार्किंगचे उदघाटन करण्यासाठी व्यापारी वर्गाला निवेदन द्यावे लागले. सहा महिन्यापूर्वी पार्किंगचे दर ठरविण्याबाबत आणि पार्किंगचे टेंडर करण्याबाबत लेखी पत्र देवूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. उदघाटन केल्यापासून आजमितीपर्यंत या ठिकाणी पार्किंगचा साधा बोर्ड पण लावला गेला नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे दिवाळी सिझनला या ठिकाणी फक्त पाच सहा गाड्या पार्किंग करण्यात आल्या आणि यापासून ६०० रुपये एवढं उत्पन्न मिळाले हे विचार करण्यासारख आहे. पर्यटकाना सोईच्या दृष्टीने सुमारे २५ लाख रुपयाचे दिशादर्शक फलक बसवण्यात आलेले होते. पैकी काही दिशादर्शक फलक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्यानं ते बदलून देणे बाबत किंवा त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना करूनही गेले वर्षभर ठेकेदाराकडुन कुठलीही कार्यवाही झाली नाही आणि प्रशासकडूनही ठेकेदारावर नोटीस देण्यापलिकडे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याचा फटका दिवाळीसाठी आलेल्या पर्यटकांना सहन करावा लागला, याकडे महेश कांदळगावकर यांनी लक्ष वेधलं आहे.
फोवकांडा पिंपळ येथील फाऊंटन बंद ; स्ट्रीट लाईट, डेकोरेटिव्ह लाईटही बंद
मालवण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फोवकांडा पिंपळ येथील गार्डन सुशोभीत करून त्या ठिकाणी रंगीत कारंजा बसविण्यात आला होता. पण याठिकाणचा कारंजा गेले सहा महिने बंद अवस्थेत आहे. डेकोरेटिव्ह लाईट बंद आहेत. या दुरावस्थेकडे लक्ष दिला जात नसेल तर इतर ठिकाणी नवीन कामे प्रस्तावित कशासाठी अशीही शंका वाटते. शहरात २० ते २५ ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले होते. पण आता त्यातील ८० % हायमास्टच्या लाईट गेले वर्षभर बंद आहेत. वारंवार सांगूनही ही काम झालेली नाहीत हे भूषणावह नाही. चिवला बीच, रॉक गार्डन, मालवण जेट्टी येथे बसविण्यात आलेल्या डेकोरेटिव्ह लाईट पैकी बऱ्याचश्या लाईट गेले सहा महिने बंद आहेत त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. शहरातील स्ट्रीट लाईटची परिस्थिती याहून भयानक आहे. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी स्वखर्चातून बऱ्याचश्या लाईट दुरुस्त करून बसवत आहेत.
मालवण शहरात सुमारे १ कोटी ८०/लाख रुपये किमतीचे सुसज्ज असे भाजी मार्केटचे काम गेले सहा महिने बंद आहे. त्याच प्रमाणे मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुमारे ७५ लाख रुपये किमतीच्या मल्टीपर्पज एसी हॉलचे काम पण बंद आहे. सुमारे २ कोटी रुपयांची अग्निशमन इमारत, ५० लाखचे न. प. आवार सुशोभीकरण ही कामे महिनोंमहिने संथ गतीने सुरू आहेत. शहरात प्रस्तावित १५ कोटी रुपयाचे मत्स्यालय, भुयारी गटार योजना बाबत मागील ११ महिन्यात कुठलीही प्रगती झालेले नाही. शहरात कचऱ्यापासून खत निर्मितीच्या दोन मशीन बसविण्यात आल्या होत्या. या मशीन गेले वर्षभर बंद ठेवण्यात आल्या आहेत. आणि त्यामुळे कचरा डम्पिंग ग्राउंडवर फक्त कचरा साठवला जात आहे. त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे आणि जिल्हा नियोजन निधीतुन दिलेल्या पैशाचा पण अपव्यय होत आहे. मालवण न. प. मासेमार्केट इमारतीच्यावर गाळे बांधून खूप वर्ष झाली. पण लाईट सारख्या सुविधा नव्हत्या. आमच्या कालावधीत या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात आली. पण आजमिती पर्यंत हे गाळे भाड्याने देण्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे न. प. चे आर्थिक नुकसान झालेले आहे. प्रशासनाकडून फक्त पत्र, नोटिसा, दंड ही प्रशासकीय प्रक्रिया राबवली जात आहे. पण निधी उपलब्ध करुन देऊनही जर काम होत नसतील तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखं होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सगळ्याच विकास कामांना ब्रेक लागला आहे अशीच सध्या परिस्थिती आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करूनही मुख्याधिकारी यांच्याकडून ठोस अशी कार्यवाही केली जात नाही असे निदर्शनास येत आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्ती कडे असल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे अशी आमची धारणा आहे. वरील कामाबाबत पुन्हा एक महिन्यांपूर्वी कळवूनही यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. तरी याबाबत आपल्या स्तरावर माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी महेश कांदळगावकर यांनी केली आहे.