ग्रा. पं. ची सत्ता भाजपकडे द्या, साडेआठ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू
भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणेंची बांदिवडे गावच्या बैठकीमध्ये ग्वाही ; त्रिंबकलाही भेट
वैभव नाईकांना बांदिवडे म्हटलं की प्रफुल्ल प्रभूच दिसतात, गावचा विकास निधीही नाकारला : प्रभूंचा आरोप
मालवण | कुणाल मांजरेकर
राणे साहेब सत्तेत असतानाचा साडेआठ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पैसे पाठवा असं सांगायची गरज नव्हती. हा जिल्हा राणे साहेबांचा जिल्हा आहे हे अधिकाऱ्यांना माहित असल्याने अन्य जिल्ह्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी मिळत होता. कॅबिनेट बैठकीमध्ये अन्य जिल्ह्यांना जेवढा निधी देताय, तेवढा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला द्यावाच लागेल, असं ठामपणे सांगणारे एकमेव राणेसाहेब होते. मात्र २०१४ नंतर सत्ता बदल होताच जिल्ह्याचा राजकीय विजनवास सुरु झाला. जिल्ह्याचा विकास निधी अचानक थांबला. मंत्रालयाच्या गेटवर तुमच्या आमदाराला साधा चौकीदार ओळखत नाही, मग अधिकारी निधी कसा देणार ? पण आता राज्यातील चित्र बदललं आहे. राणे साहेबांकडे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकार आलं असून जिल्ह्याला रवींद्र चव्हाण यांच्यासारखे पालकमंत्री लाभले आहेत. त्यांच्याकडे राज्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद आहे. त्यामुळे आता विकासाची काळजी करू नका, ग्रामपंचायतीची सत्ता भाजपाकडे द्या, साडेआठ वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बांदिवडे (ता. मालवण) येथील बैठकीत बोलताना दिला आहे. येथील स्थानिक आमदाराकडून गावचा विकास नाकारला जात आहे, त्याला मतदानातून उत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी रात्री त्रिंबक आणि बांदिवडे गावाला भेट देऊन भाजपा पुरस्कृत पॅनलच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बांदिवडे येथे आयोजित छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, प्रफुल्ल प्रभू, संतोष गावकर, प्रफुल्ल प्रभू, सरपंच प्रविणा प्रभू, उपसरपंच किरण पवार, शंकर आईर, सतीश बांदिवडेकर, उदय सावंत, संदीप आईर, आशिष चेंदवणकर, विनोद चेंदवणकर, बबन मुणगेकर, सुनील घाडी, बबन मांजरेकर, नागेश परब, संदेश पवार, संतोष घाडी, दिनेश परब, प्रकाश मेस्त्री, जयमल राणे, मंगेश राणे, सूर्यकांत पवार यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार उमेश शंकर परब, सदस्य पदाचे उमेदवार विकास घाडी, अंजली घाडीगावकर, स्वाती आईर, जयप्रकाश बांदिवडेकर, तन्वी कासले, शाहूलखन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, आज भाजपला सुगीचे दिवस आले आहेत. नजर जातेय तिकडे लोकांचे प्रवेश होत आहेत. आमच्याकडे आल्यावर कामे होतात म्हणून लोक विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. लोकांना विकास कामे हवीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. केंद्रात राणे साहेबांकडे एमएसएमई चं खाते आहे. राज्यात शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे ते आपल्याला भरभरून देईल हा विश्वास जनतेला आहे, असे ते म्हणाले.
आठ- साडेआठ वर्ष येथील लोकांनी खोटं ऐकलं, त्यांना खोटं भोगावं लागलं. गोड बोलून विकास होत नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष महाराष्ट्राची वाट लावली. डिपीडीसीचा निधी ४० टक्क्यावर आणला. या विरोधात खासदार बोलायला तयार नाही आमदार बोलायला तयार नाही. मग काय करणार ? ते फक्त पत्रच वाटणार. या लोकांमुळे आपले दोन टर्म फुकट गेले. राणेसाहेब हरले आणि निधी बंद झाला. पण आता चित्र बदललं आहे. तुम्ही जी विकासकामे दिलात, ती येत्या काही दिवसात शंभर टक्के पूर्ण होणार. आज केंद्रात आपलं सरकार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. त्यामुळे तुम्ही विकासाची काळजी करू नका. विकासाचा बेकलॉग भरून काढणार. स्वतः रवींद्र चव्हाण साहेबानी शब्द दिला आहे, असं सांगून मी तुम्हाला निराश करणार नाही. पोकळ शब्द देणार नाही. गावचा विकास शंभर टक्के केला जाईल, तुम्ही फक्त याठिकाणी भाजपच्या विचाराची सत्ता द्या, असे आवाहन निलेश राणे यांनी केले.
आमदार वैभव नाईक यांनी निधी नाकारला : प्रफुल्ल प्रभू यांचा आरोप
भाजपाचे स्थानिक नेते प्रफुल्ल प्रभू यांनी आमदार वैभव नाईक यांनी गावच्या विकासासाठी निधी नाकारल्याचा आरोप केला. पाच वर्षांपूर्वी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांकडून विकास निधीचं पत्र आणलं होते. पाच वर्ष होऊन गेली पण रस्ता झाला नाही. निवडणुकीच्या वेळी खार बंधाऱ्याचं भूमिपूजन केलं पण खार बंधारा काही अद्याप झाला नाही. आमचे सरपंच आणि उपसरपंच रस्त्यासाठी गेले होते. तेव्हा तुम्ही आला तर प्रभुना सांगा रस्ता करायला, असं उत्तर आमदारांनी दिले. मग तुम्ही कशाला ? तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून दिले होते. मग निवडून आल्यावर पक्षभेद करता नये. बांदिवडे म्हटलं की आमदारांना डोळ्यासमोर प्रफुल्ल प्रभुच दिसतात. राणे साहेब सत्तेत असताना दहा वर्षांपूर्वी वाडीवाडीतील रस्ते झाले. पण आज त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. असे सांगून विकास कामांची यादी त्यांनी निलेश राणे यांना सादर केली. या यादीतील अग्रक्रमाची कामे तात्काळ घेण्यात येतील, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनीही मार्गदर्शन केले.