Big Breaking : राज ठाकरेंची जानेवारीत सिंधुदुर्गात जाहीर सभा ?
मिशन कोकण अंतर्गत संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोड मध्ये
कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केली आहे. येत्या काही दिवसात नवीन कार्यकारणी निवडण्यात येणार असून कोकणात संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आता मिशन कोकण हाती घेतले आहे. या अंतर्गत येत्या जानेवारीत राज ठाकरे यांची सिंधुदुर्गात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची विश्वासनीय माहिती हाती आली आहे. कुडाळ अथवा मालवणमध्ये ही जाहीर सभा घेण्यात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर बराच काळ लोटला तरी कोकणात संघटना बांधणी समाधानकारक झालेली नाही. जिल्ह्यात मनसेत गटातटाचे राजकारण वाढले असून याचा प्रत्यय राज ठाकरे यांना स्वतःला अनुभवता आला. त्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी तातडीने घेतला. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोकणात संघटना मजबूत करण्यासाठी नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर सभा आयोजित करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला असून कुडाळ किंवा मालवण मध्ये जानेवारी महिन्यात ही सभा होईल असे समजते.