निलेश राणेंचा करिष्मा ; मालवण तालुक्यात तब्बल १० ग्रा. पं. बिनविरोध
कुडाळ मध्येही ३ ग्रा. पं. वर झेंडा ; राणेंनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांचा करिष्मा ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. श्री. राणेंच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल १० ग्रामपंचायती भाजपाकडे बिनविरोध आल्या आहेत. याबाबतची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. दरम्यान, कुडाळ तालुक्यात देखील भाजपाकडे तीन ग्रामपंचायती आल्या आहेत. या श्री. राणे यांनी ट्विट करीत भाजपच्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळी सुरु झाली आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असणाऱ्या या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात भाजपाच्या प्रचाराचे नियोजन सुरु आहे. तालुक्यात बांदिवडे, कोईल, पळसंब, काळसे, आंबेरी, कातवड, आनंदव्हाळ, घुमडे, साळेल, आंबडोस, शिरवंडे या ग्रामपंचायतीत भाजपचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर कुडाळ तालुक्यात आंबडपाल, रांगणा तुळसूली, पांग्रड या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.