डंपरची रेल्वे फाटकाला धडक ; हळवल येथील घटना
कणकवली : रेल्वेचे फाटक पुर्ण उघडण्याआधीच दोन्ही बाजूच्या दोन्ही अवजड वाहनांनी रेल्वे ट्रॅक घाईत-घाईत ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एका डंपरची धडक बसल्याने एका बाजुच्या फाटकाचे मोठे नुकसान झाले. हळवल फाटकावर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वा. च्या सुमारास ही घटना घडली.
शुक्रवारी सायंकाळची ४.४५ वा.ची मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस कणकवली स्टेशनवर येत असल्याने हळवल येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजुच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. एक्सप्रेस गेल्यावर फाटक उघडण्यात आले. परंतु फाटक चे गेट पूर्ण उघडण्याअगोदर (पुर्ण वर होण्याआधी) घाईने डंपर पलिकडे नेत असताना डंपरच्या हौद्याला धडकुन फाटकाचे नुकसान झाले.
कोकण रेल्वेच्या अभियंत्यानी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नादुरूस्त झालेले फाटक बाजुला केले. याप्रकारात काही वाहतुक काहीकाळ विस्कळीत झाली. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहतुक सुरळीत केली. हळवल-शिरवल-कळसुली येथील क्रशरमधील खडीची वाहतुक करताना डंपर भरधाव वेगात जातात. यामुळे रस्त्यात अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेक जखमी झाले आहेत. कित्येक मुक्या पाळीव प्राण्यांनी जीव गमावला आहे. या भरधाव डंपरावर कोण नियंत्रण आणणार असा सवाल नागरिक करीत आहेत.