पाटबंधारेमंत्री ना. जयंत पाटील लवकरच सिंधुदुर्ग भेटीवर !
सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या घेणार जाणून
आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी मुंबईत घेतली भेट
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्पासह सिंधुदुर्गातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी शिवसेना आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी चर्चा केली. तसेच ना. जयंत पाटील यांना सिंधुदुर्गात येण्याचे निमंत्रण आ. वैभव नाईक यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच सिंधुदुर्गात येऊ, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या भेटीत सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांविषयीच्या विविध समस्यांबाबत ना. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेषतः कणकवली तालुक्यातील नरडवे व देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पा संबंधीच्या समस्यांकडे जलसंपदा मंत्री जयंत पाटील याचे लक्ष वेधण्यात आले. पाटबंधारे प्रकल्पांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर यावे असे निमंत्रण ना. जयंत पाटील यांना आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिले. याविषयी सकारात्मक प्रतिसाद देताना येत्या काळात निश्चितपणे पाटबंधारे प्रकल्पांविषयीच्या विविध समस्या मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही ना. जयंत पाटील यांनी आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांना दिली.