भरधाव डंपरची ग्रामस्थांना हूल ; कुंभारमाठमध्ये वातावरण तापलं

वाळू घेऊन जाणारे ९ डंपर अडवले ; घटनास्थळी पोलीस दाखल ; गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू

मालवण : भरधाव डंपर अंगावर आल्याने कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री ग्रामस्थ संतप्त बनले. भरधाव वेगाने मागून येणारे नऊ डंपर यावेळी रोखण्यात आले. याबाबत माहिती मिळताच मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थाच्या अंगावर आलेला डंपर (जी ए ०६ टी ३५७७) पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करत अन्य डंपरवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरु होती. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ शांत झाले व नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ग्रामस्थ बाळा सामंत यांच्या अंगावर डंपर आल्यानंतर हा प्रकार घडला.

अंगावर आलेला एक व अन्य आठ असे एकूण नऊ डंपर अडवण्यात आले होते. वाळू वाहतुकीसाठी हे डंपर दररोज भरधाव वेगाने जा ये करत असतात. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तसेच मार्गावर स्पीड ब्रेकर उभारणी मागणी तसेच मार्गावर पोलिसांची गस्त ठेवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ व परिसरातील ग्रामस्थ तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. रात्री उशिरापर्यत पुढील कारवाई सुरू होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!