आज मध्यरात्रीपासून ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरू
सिंधुदुर्ग पासींगच्या वाहनांना ५० टक्के सवलत
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू होणार आहे. राजस्थानच्या गणेशगढीया या कंपनीकडून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने आज जारी केली आहे. दरम्यान, टोल वसुली सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांकडून आंदोलनेही होण्याची शक्यता आहे. टोल वसुलीमध्ये सिंधुदुर्गपासिंगच्या वाहनांना टोल माफी देण्यात आलेली नाही. फक्त टोल मध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे.
याखेरीज सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना महिन्यासाठी ३१५ रूपयांचा पास असणार आहे. ओसरगाव बरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमेवरील हातीवले टोल नाका देखील मध्यरात्रीपासून कार्यान्वित होणार आहे. येथील ठेका यशवंत नारायण मांजरेकर यांना देण्यात आला आहे. ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जून पासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका देण्यात आला. मात्र प्रखर राजकीय विराेधामुळे ही कंपनी टोल वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. आता पुन्हा टोल वसुली सुरू होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. टोलवसुलीमध्ये कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या वाहनांसाठी ९० रूपये तर मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १४५ रूपये आणि ट्रक आणि बस (२ ॲक्सल) साठी ३०५ रूपये एवढा टोल एका वेळच्या प्रवासासाठी वसुल होणार आहे.