नितेश राणेंचे कणकवली, वैभववाडीतील अनधिकृत धंद्यांवर दुर्लक्ष का ?

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा सवाल ; बांद्यात अवैध दारू नेताना मिळून आलेला माजी सरपंच कोणाच्या पक्षाचा कार्यकर्ता होता ?

कणकवली : मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अग्रवाल यांची भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. मात्र आमदार नितेश राणे यांना केवळ देवगड जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात. त्यांच्या मतदार संघातील अन्य दोन तालुक्यांतील अवैध धंदे त्यांना दिसत नाहीत का ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली तालुक्यातील ज्या माजी सरपंचाची गाडी अवैध दारू नेताना आज पकडली गेली तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ? गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असताना राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलीसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही उपरकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.

दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. आमदार राणेंच्या मतदार संघातील गावागावात आज मटका जुगार सुरु असून अंमली पदार्थ विक्री करणारे गावागावात आणि नाक्या नाक्यावर निर्माण झाले आहेत. याची माहिती आम्ही पोलीस अधीक्षकांना दिली आहे. आपल्या मतदार संघात अवैध धंदे करणारे कोण आहेत, आणि आज बांद्यात अवैध दारू आणताना गाडी पकडलेली व्यक्ती कोणाच्या पक्षाची होती, याची माहिती आमदार राणे यांनी घ्यावी. याची माहिती त्यांना नसेल तर आम्ही देऊ शकतो. जिल्ह्यातील व्यसनी लोकांना आवर घालण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून पुढाकार घ्यावा. अवैध धंदे केवळ देवगड आणि जामसंडे या दोन गावापुरता मर्यादित नाही. त्यामुळे दोन गावातील अवैध धंद्यांसाठी पोलीस ठाण्यावर आमदारांना मोर्चा काढावा लागतो, हे दुर्दैव आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये असे आवाहनही उपरकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!