आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई – तहसीलदारांचा इशारा

आचारसंहिता कालावधीत तंटामुक्तीच्या बैठका घेऊ नका

कणकवली : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गावात कुठल्याही विकास कामांची भूमिपूजने, जातीय धार्मिक भावना भडकेल असे वक्तव्य करु नये. आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाईचे संकेत कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिले.

तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, निवडणूक सहायक मयुरी चोपडे, पोलीस किरण मेथे, मंगेश बावदाने यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे भूषण परुळेकर, विश्राम सावंत, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाताडे उपस्थित होते.

आचारसंहिता लागू असताना जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामे भूमिपूजन करता येईल का? अशी विचारणा केली असता कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नाही. विकास कामांबाबत कोणतीही आश्वासने किंवा मतदारांवर प्रभाव पडेल असं वस्तूंची वाटप करता येणार नाही. तंटामुक्त समिती बैठक निवडणूक कालावधीत होऊ नये तसे पत्र संबंधित लोकांना देण्यात यावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.

निवडणूक नोटीस १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. १८ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर हा निवडणूक आचारसंहीता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत ऑफलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर असलेल्या अर्जाची छाननी होईल. ५८ ग्रामपंचायती साठी १८८ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात निवडणूक होत असताना आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!