खरेदी विक्री संघ निवडणूकीत कामगारांच्या पॅनेलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपाला यश
बाळू अंधारी ; शहरात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला वाढीव मतदान
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने कामगारांच्या पॅनलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपच्या पॅनलला यश मिळाले आहे. झालेल्या मतदानात चांगली लढत महाविकास आघाडीने दिली. मालवण शहरातही जास्त मतदान झाले. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी तयारीनिशी या निवडणुकीत उतरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आणि खरेदी विक्री संघाचे उमेदवार बाळू अंधारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने १५ पैकी १५ ही जागांवर यश मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. या निकालाबाबत महाविकास आघाडीच्या वतीने बाळू अंधारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. या निवडणुकीत झालेल्या मतदानात चांगली लढत महाविकास आघाडीने दिली. झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता ५०० मतांच्या घरात जाण्यात आमच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. अटीतटीच्या लढतीत मालवण शहरातून महाविकास आघाडीला जास्त मतदान झाले. त्यामुळे मालवण शहर आणि तालुक्यातील मतदारांचे आभार आम्ही मानत आहोत. कामगारांच्या पॅनलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपला यश.
मिळाले आहे. अमित गावडे यांच्या मतांमुळेच विरोधकांना विजय शक्य झाला. हे सत्य कोणीही नाकारता नये. झालेल्या लढतीत कष्ट करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानत असून या नंतर अधिक तयारीनिशी आम्ही या निवडणुकीत उतरू, असे बाळू अंधारी यांनी म्हटले आहे.