निलेश राणेंनी बोलून नाही, करून दाखवलं !
मालवणातील कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला पुढाकार
कोविड सेंटरमधील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन डॉक्टरांकडे सुपूर्द
कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांचे स्थलांतरण टळले ; नातेवाईकांमधून समाधान
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या दातृत्वाचा अनुभव पुन्हा एकदा मालवणकरांना आला आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता राज्य सरकार व्यक्त करीत असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेले कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात येणार असून यामुळे मालवण शहरातील कोविड सेंटर बंद करून येथे दाखल असलेल्या रुग्णांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय बुधवारी रुग्णालय प्रशासनाने घेतला. मात्र नातेवाईकांनी त्याला आक्षेप घेतल्याने मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी याबाबतची माहिती भाजप नेते निलेश राणे यांना दिल्यानंतर त्यांनी येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन स्वतः देण्याचे मान्य केले. केवळ आश्वासनावर न थांबता निलेश राणे यांनी तात्काळ सदरील रक्कम श्री. चिंदरकर यांच्या मार्फत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे. त्यामुळे याठिकाणी दाखल असलेल्या तीन रुग्णांचे स्थलांतरण टळले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
कोविड सेंटर बंद करणे म्हणजे तालिबानी सरकारचा अजब फतवा : धोंडू चिंदरकर
भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी कोविड सेंटर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. एकीकडे राज्य सरकार चतुर्थी नंतर तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करत असताना दुसरीकडे शासकीय कोविड सेंटर बंद करून सरकारला कोणता संदेश द्यायचा आहे ? असा सवाल श्री. चिंदरकर यांनी करून हे सरकार म्हणजे तालिबानी सरकार असल्याचा आरोप केला. मालवण मधील ही बाब आम्ही निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आपण स्वतः मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे. केवळ आश्वासनावर न थांबता त्यांनी तात्काळ सदरची रक्कम सुपूर्द केली असून ही रक्कम डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. यानंतर देखील येथील कोविड सेंटर बंद न होण्यासाठी आम्ही भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगून सरकारला कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवायची आहे की वाढवायची आहे ? असा सवाल श्री. चिंदरकर यांनी केला. यावेळी महेश मांजरेकर उपस्थित होते.