गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकले ; सिंधुदुर्गात हे असतील नवीन दर

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅसचे दर पुन्हा वाढले ; १५ दिवसात दुसरी दरवाढ

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग : पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आज पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे आजपासून घरगुती सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढले असून व्यावसायिक सिलेंडरचे दर ७५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

     आता दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपये झाली आहे. यापूर्वी १८ ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे मागील १५ दिवसात गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी १ जानेवारी ते १ सप्टेंबरदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १९० रुपयांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने गॅसवरील सबसिडी काढून टाकली असून, घरगुती गॅसची किंमत मागील वर्षात दुप्पट झाली आहे. १ मार्च २०१४ रोजी ४१०.५० रुपये गॅस सिलेंडर होता. दरम्यान, आज झालेल्या दरवाढीनुसार, मुंबईत १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलेंडर ८८४.५० रुपयांना तर चेन्नईमध्ये ९००.५० रुपयांना मिळेल.

सिंधुदुर्गात हे असतील नवीन दर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढले आहेत. यापूर्वी घरगुती सिलेंडरचे दर ८६८ रुपये होते. ते आता २५ रुपयांनी वाढून ८९३ रुपये झाले आहेत. तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात देखील ७५ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी हे सिलेंडर १६०७ रुपये होते. ते आता १६८१.५० रुपये झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!