मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा विजय निश्चित : निलेश राणेंचा विश्वास
खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास भाजपा सक्षम ; आता विजयाची औपचारिकता
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत. मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आम्ही जबाबदार उमेदवार रिंगणात उतरवले असून १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व. सुनील मलये यांचे सहकारी व आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत असून मागील सात वर्षे ज्या प्रमाणे संघावर एकहाती सत्ता होती, तशाच पद्धतीने आगामी काळात सर्व संचालक मंडळ पारदर्शक कारभार करेल असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या पार्शवभूमीवर मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांची भाजपा पुरस्कृत उमेदवारांनी निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. त्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालवण खरेदी विक्री संघात भाजपा पुरस्कृत पॅनेल आणि महाविकास आघाडी पॅनल अशी थेट निवडणूक होणार आहे. अनेक विद्यमान संचालकांचा भरणा तसेच तालुक्यातील सोसायट्यांवर असलेले वर्चस्व पाहता भाजपा पुरस्कृत उमेदवार ही निवडणूक सहजपणे जिंकतील असा विश्वास उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपा पुरस्कृत सर्व १५ उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार संस्था मतदार संघ कृष्णा चव्हाण, राजन गावकर, महेश मांजरेकर, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई. व्यक्ती मतदार संघ : विजय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर. अनुसूचित जाती जमाती : सुरेश चौकेकर. इतर मागास वर्ग : कृष्णा ढोलम. भटक्या विमुक्त जाती जमाती : अशोक तोडणकर. महिला जागा : सरोज परब, अमृता सावंत. यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दादा नाईक, संतोष गावकर, रवी मालवणकर, राऊत, प्रमोद करलकर, पूजा करलकर, मनवा गावकर, मनाली चव्हाण, संतोष चव्हाण, यशवंत पराडकर, आबा ढोलम, भावेश चव्हाण, भाग्येश चव्हाण, यासह अन्य उपस्थित होते.
स्व. सुनील मलये यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल
मालवण तालुका सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे सुनील मलये यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले. त्यांच्या सोबत काम केलेली अनेक लोक आज या पॅनलच्या माध्यमातून एकत्र आली आहेत. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय हा निश्चितच आहे. हा विजय म्हणजेच स्व. सुनील मलये यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असेही निलेश राणे यांनी सांगितले.