शिंदे गटाने हात झटकले ; किसन मांजरेकर पडले “एकाकी”
मालवण | कुणाल मांजरेकर
अनधिकृत पर्ससीन मासेमारीप्रकरणी निवतीतील मिनी पर्ससीन नेटवर पुढील कारवाईसाठी प्रतिवेदन दाखल करण्यात येऊ नये, यासाठी शिंदे गटाच्या किसन मांजरेकर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केल्यानंतर शिंदे गटाने या प्रकरणातून हात झटकले आहेत. हा विषय केवळ किसन मांजरेकर यांचा वैयक्तिक असून शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर, पराग खोत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे शिंदे गटात किसन मांजरेकर एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले आहे.
ठाकरे गटाच्या बाबी जोगी यांच्या म्हणण्यानुसार ते सोमवारी सकाळी एका कामानिमित्त बंदर विभागाच्या कार्यालयात गेले असता, तेथे शिंदे गटातील मांजरेकर यांच्यासह अन्य काही कार्यकर्ते वेंगुर्ल्यातील मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांना शोधत आले होते. परंतु जोशी हे मत्स्य कार्यालयात असल्याचे सांगितले गेल्यानंतर ते मत्स्य कार्यालयात गेले. यासंदर्भात श्री. जोगी यांनी मांजरेकर यांना विचारणा केली. पर्ससीनवर कारवाई करू नका, अशी भूमिका जर शिंदे गटाकडून घेतली जाणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. तुम्ही या विषयात पडू नका, असा इशारा आपण मांजरेकर यांना दिल्याचे जोगी म्हणाले.
किसन मांजरेकर यांच्या भूमिकेमुळे पारंपरिक मच्छिमार दुखावला जाणार, ह्या शक्यतेने शिंदे गटाने मांजरेकर यांच्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे. अनधिकृत पर्ससीन मासेमारी प्रकरणी निवतीतील मिनी पर्ससीन नेटवर पुढील कारवाई साठी प्रतिवेदन दाखल करण्यात येऊ नये यासाठी किसन मांजरेकर आणि अन्य जणांनी बाजू मांडली होती. त्यात शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना चा कोणताही संबंध नाही. तो वैयक्तिक किसन मांजरेकर यांचा प्रश्न असेल. आम्ही कोणीही शिंदे गटाचे पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात नाही. तसेच पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांचा जो वाद आहे, तो वाद संबंधित समिती आणि न्यायालय सोडवेल. शिंदे गट पारंपरिक मच्छिमारांच्या नेहमीच पाठीशी असेल, असे शिंदे गटाने म्हटले आहे.