सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ठेवींवरील व्याजदरात आजपासून वाढ …
बँकेच्या सभासद, ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा : अध्यक्ष मनिष दळवी यांचे आवाहन
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ नोव्हेंबर २०२२ पासून ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा सभासद आणि ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा बँक असुन या बँकेच्या जिल्ह्यामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह आरटीजीएस / एनइएफटी, एटीएम, मोबाईल अँप, आयएमपीएस, युपीआय, इ-कॉम, क्यूआर कोड, बीपीएस, बीबीपीएस, सीटीसी, इ-मेल अकाउंट स्टेटमेंट इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा ग्राहकांना पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँक ग्राहकांना विविध बँकिंग सेवा सुविधा सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. जिल्हा बँकेचे मुदत ठेवीवरील व्याज अन्य बँकांच्या तुलनेत वाढीव असतात. आता बँकेने १ नोव्हेंबर २०२२ पासून सदर व्याज दरामध्ये वाढ केलेली आहे. बँकेने एक वर्ष कालावधीसाठी ६.५०% तर २ वर्षे ते ३ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीकरिता ७.००% असा व्याजदर ठेवलेला आहे. बँकेच्या सर्व ‘अ’ वर्ग भागधारक सभासद व ज्येष्ठ नागरिक यांना मुदत ठेवीवर नियमित व्याजदर पेक्षा अर्धा टक्का ज्यादा व्याजदरची सवलत आहे. बँकेच्या सर्व ग्राहकांनी त्यांच्याकडील रक्कम बँकेत गुंतवून सदर वाढीव व्याजदरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.