… हा तर नगराध्यक्ष कुचकामी असल्याचा सत्ताधारी नगरसेवकाने दिलेला पुरावा

भाजप गटनेते गणेश कुशे यांचा टोला : नगरसेवक यतीन खोत यांनी नगराध्यक्षाना घरचा आहेर

सगळीच कामं नागरिक आणि नगरसेवकांनी करायची तर नगरपालिका कशासाठी ?

फक्त न झालेली कामे दाखवून बिलं काढण्यासाठीच का ? कुशेंची तिखट प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

    मालवण नगरपालिकेत शिवसेनेसोबत असलेल्या नगरसेवक यतीन खोत यांनी स्वतःच्या प्रभागात स्वखर्चाने झाडे आणि ग्रास कटाई करून घेतली आहे. या कामावरून भाजपचे गटनेते गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर टीका केली आहे. हा तर सत्ताधारी नगरसेवकाने नगराध्यक्ष कुचकामी असल्याचा दिलेला पुरावा असून नगरसेवक यतीन खोत यांनी स्वखर्चातून स्वतःच्या प्रभागात काम करून नगराध्यक्षाना घरचा आहेर दिला आहे. शहरात प्रत्येक कामं जर नागरिक आणि नगरसेवकांनी करायची तर नगरपालिका आहे कशासाठी ? फक्त न झालेली कामे दाखवून बिलं काढण्यासाठीच का ? असा तिखट सवालही श्री. कुशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

श्री. कुशे यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्ष म्हणून आम्ही या गोष्टी सातत्याने मांडत असतो. परंतु आता सत्ताधारी नगरसेवकानेच पुराव्यासह ती गोष्ट सिद्ध केली. शहरातील स्ट्रीटलाईट नगरसेवकांनी स्वखर्चाने दुरुस्त करायच्या, झाडी नगरसेवकांनी स्वखर्चातून तोडायची, वादळात पडलेली झाडे नागरिकांनी स्वतः उचलायची मग नगरपालिका कशासाठी ? फक्त न झालेली कामे दाखवून बिलं काढण्यासाठी का ? शहरात कचरा नियोजन शून्य, साफसफाईच्या नावानं बोंब. शहरातील बाजारपेठेसह, मेढा, राजकोट, कचेरी, कोतेवाडा, गवंडीवाडा, मच्छिमार्केट या भागातील स्ट्रीटलाईट तसेच हायमास्ट तोक्ते वादळापासून बंद आहेत. वादळाला तीन महिने उलटले आणि आत्ता चतुर्थी तोंडावर आल्यावर दुरुस्तीसाठी निविदा काढल्या जात आहेत. यातून फक्त दिखाऊपणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे. चतुर्थी याचवर्षी आली का ?? याचं नियोजन पूर्वी व्हायला नको का ? नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी नुसते ठेकेदारांची बिलं काढण्यात दंग आहेत. त्यांना बाकी काही पडलेलं नाही. यावर्षी गटार सफाई योग्य प्रकारे झालीच नाही. अनेकांच्या घरात पाणी घुसलं तरीही स्वतःचीच पाठ थोपटत ठेकेदाराला पाठीशी घालायचं आणि त्याच्यावर कारवाई सोडाच उलट त्याची बिलं मात्र न चुकता काढायची, या मागचं अर्थकारण न समजण्याएवढी जनता मूर्ख नाही.

  शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. काँक्रीटीकरण केलेल्या पाणंदीमध्ये शेवाळ धरल्यामुळे त्या पायवाटा बुळबुळीत झालेल्या आहेत. त्या स्वच्छ करायच्या कोणी ? रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडायची कोणी ? रस्त्यावरील खड्डे बुजवायचे कोणी ? स्ट्रीटलाईट लावायच्या कोणी ? याची उत्तरे जर 'नगरसेवक' असेल तर नगराध्यक्ष प्रशासन चालवतात म्हणजे नक्की काय करतात ? गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष ना कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावू शकले, ना स्ट्रीटलाईटचा, ना भटक्या कुत्र्यांचा, ना मोकाट गुरांचा, ना भुयारी गटारचा. जनतेने मोठ्या अपेक्षेने लोकनियुक्त नगराध्यक्ष, प्रशासनचा प्रदीर्घ अनुभव असणारे म्हणून तुम्हाला नगराध्यक्षपदी निवडून दिलं, युतीचे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात, पण पुढे जाऊन तुम्ही काही नगरसेवक आयात करून स्वबळावर सत्ता काबीज केलीत. पण त्यातून जनतेला काय दिलेत ? ५ वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती झाली का, की त्या समस्या आजही तशाच आहेत ? कामगार नाहीत, साहित्य नाही, नियमात बसत नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला जनतेने तिथे बसवलं का ? आत्ता तरी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणार की फक्त ठेकेदारांना पाठीशी घालणार ? बाकी कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी नगरपालिका बघा, त्यांनी कशाप्रकारे विकास केला. आता तरी जनतेला न्याय द्या, शेवटचे तीन महिने शिल्लक राहिले. आता तरी जनतेच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या, असे गणेश कुशे यांनी म्हटले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!