रामेश्वर नारायणाच्या पालखी सोहळ्याने मालवण नगरीं भक्तीरसात चिंब
पालखी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी ; बाजारपेठेवर मात्र आर्थिक मंदीचे सावट
मालवण | कुणाल मांजरेकर
ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा पालखी सोहळा बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. दोन वर्षानंतर हा सोहळा कोरोना मुक्त वातावरणात साजरा होत असल्याने या सोहळ्याला भविकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्या निमित्ताने मालवणची बाजारपेठ आकर्षक विद्युत रोषणाईने सजली होती. अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी पालखी सोहळ्या निमित्ताने आपली दुकाने थाटली होती. मात्र आर्थिक मंदीचा परिणाम बाजारपेठेवर जाणवून आला. अपवाद वगळता अनेक दुकानांमध्ये ग्राहकांचा अभाव दिसून आला. मालवणचे अर्थकारण हे प्रामुख्याने मासेमारी व्यवसायावर चालते आणि अलीकडे मत्स्यव्यवसाय अपेक्षित होत नसल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.
मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा होतो. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या पालखी सोहळ्यावर अनेक निर्बंध आणण्यात आले होते. मात्र या वर्षी कोरोना मुक्त वातावरणात पालखी सोहळा संपन्न होत असल्याने पालखी समवेत भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पालखीत बसून आपल्या लवाजाम्यासह मालवणच्या परिक्रमणेसाठी बाहेर पडली. या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण मालवणनगरी सजली होती.
पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मार्गावर रांगोळ्या, पताका आणि स्वागत कमानी उभारल्या होत्या. देऊळवाडा आडवण मार्गे ही पालखी भूतनाथ मंदिरा कडे पोहोचली. याठिकाणी भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. यानंतर दांडी येथे श्री मोरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पालखी दांडेश्वर मंदिरात आणण्यात आली.
यावेळी मत्स्यव्यवसायाला आणि सागरी पर्यटन व्यवसायाला बरकत यावी आणि मच्छीमारांवर आलेली संकटे दूर व्हावीत यासाठी मच्छिमार बांधवांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी रामेश्वर- नारायणाला साकडे घातले. येथून समुद्र किनाऱ्या मार्गे मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर येथे देव रामेश्वराने आपली बहीण काळबादेवीची भेट घेतली. यावेळी याठिकाणीही रितिरिवाजानुसार श्रीफळ ठेवून भेटवस्तू देण्यात आली.
त्यानंतर पालखी मेढा येथील जोशी मांड येथे दर्शनासाठी थांबली. येथेही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पुन्हा बंदर जेटी मार्गे ही पालखी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाजतगाजत मालवण बाजारपेठेत दाखल झाली. यावेळी मालवण व्यापारी संघ आणि नागरिकांच्यावतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रामेश्वर मांडावर पालखी तासभर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली.
त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणताना पोलीस प्रशासन आणि मानकरी गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. येथे भाविकांनी दर्शन घेतल्यावर रात्री साडेदहा वाजता पालखी बाजारपेठ- भरड- एसटी स्टॅन्ड मार्गे देऊळवाड्याच्या दिशेने आपल्या परतीच्या प्रवासास निघाली.
वाटेतील भाविकांना दर्शन देत पालखीतील रामेश्वर नारायण रात्री उशिरा पुन्हा देऊळवाडा येथील आपल्या राऊळात विराजमान झाले. या पालखी सोहळ्यात हजारो भविकांसह आमदार वैभव नाईक, मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, भाजपचे युवानेते विशाल परब यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, गावकर- मानकरी सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी पालखीच्या मार्गावर तसेच शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत तसेच वाहतूक नियोजन करून सोहळा पार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.