“त्यांच्या तोंडात साखर पडो” ; “सामना” च्या अग्रलेखात पुन्हा “राणे” !
“सामना” ची भाषा मिठापासून गोड कशी करायची, याची रेसिपी आम्हाला माहिती : नितेश राणेंचं ट्विट
कुणाल मांजरेकर
गेले काही दिवस राणेंच्या विरोधात अग्रलेखाची मालिका चालवणाऱ्या शिवसेनेचे मुखपत्र “सामना” मधून आज चक्क “त्यांच्या तोंडात साखर पडो” असा अग्रलेख लिहून राणेंच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे आजचा सामनाचा अग्रलेख चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, सामनाची भाषा मिठापासून गोड कशी करायची, याची रेसिपी आम्हाला ठाऊक असल्याचं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामना मधून अलीकडे सातत्याने नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर राणेंवर झालेली कारवाई या सर्व घडामोडीत सामनाने राणेंवर शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याच सामना मधून आज “त्यांच्या तोंडात साखर पडो” हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून राणेंच्या भूमिकेचं प्रथमच समर्थन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यासाठी मी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले. जे त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात सांगणे आवश्यक होते, ते त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितले.।कोकणात त्यांच्यामुळे धुमशान झाले आणि विधायक सर्व बाजूला राहिले. महाराष्ट्र हे राजकीय मतभेदांकडे, विकासाकडे पाहणारे राज्य आहे. श्री. राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी एक विधायक भूमिका घेतली. त्यामुळे सामनाने विधायक कार्याला पाठींबा दिला. महाराष्ट्र खाऊन पिऊन सुखी आहे. ठाकऱ्यांचे नेतृत्व भक्कम आहे. अजित पवारही अर्थमंत्री म्हणून ज्ञानी आहेत. अज्ञानाचा अहंकार महाराष्ट्रावर कधीच पसरला नव्हता. तरीही केंद्रीय मंत्री राणे राज्याला सुगीचे दिवस आणायचे म्हणतात. “त्यांच्या तोंडात साखर पडो” अशा आशयाचा अग्रलेख सामनाने आज प्रसिद्ध केला आहे.
या अग्रलेखानंतर राणेंचे सुपूत्र, आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..
काही “आडनाव” ऐकली..
कि शिवसेना लगेच गोड होते..
आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..
युतीची आठवण येते..
सगळ एकदम गोड गोड..
म्हणून नेहमी सांगतो..
चड्डीत राहायचं!!!” असं त्यानी म्हटलं आहे.