राज्य सरकारच्या तिजोरीतील खडखडाटामुळेच तळाशिल बंधाऱ्याच्या “त्या” १० कोटींचे घोंगडे भिजत !
निलेश राणेंवर आरोप करण्यापूर्वी माहिती घेऊन बोला : धोंडू चिंदरकर यांचा शिवसेनेवर पलटवार
तळाशिल स्म्शानभूमी रस्त्यासाठी १० लाख देण्याच्या आ. वैभव नाईकांच्या त्या आश्वासनाचे काय झाले ?
कुणाल मांजरेकर
मालवण : तळाशिल येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या तुटपुंज्या निधीमुळे येथील ग्रामस्थांना सागरी अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी या बंधाऱ्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून १० दिवसांत १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. १५ दिवसांनंतरही हा निधी उपलब्ध न झाल्याचे सांगत निलेश राणेंवर आरोप करणाऱ्या अज्ञानी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासकीय कामकाजाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेण्याचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे. केंद्र सरकारकडून या कामासाठी निधी मंजूर होण्यासाठी क्रोसेक्शन सर्व्हे करावा लागतो. या सर्व्हेसाठी १२ लाख रुपयांची आवश्यकता असून राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा निधी राज्य सरकार देऊ शकलेले नाही, म्हणूनच केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी रखडला आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पतन विभागाकडून याची माहीती करून घ्यावी, असा सल्ला देखील श्री. चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिला आहे. दरम्यान, तळाशिल स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये देण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले होते. त्याचे काय झाले ? १० लाख देऊ न शकणाऱ्यानी १० कोटींवर बोलणे हास्यास्पद असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.
श्री. चिंदरकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, तळाशिल येथे बंधारा होण्यासाठी कुठल्या प्रकारचे साहित्य आणि नेमके काय केल्याने अतिक्रमण थांबेल याचा सर्व्हे म्हणजे क्रोसेक्शन सर्व्हे येथे होणे गरजेचे आहे. हा सर्व्हे करण्यासाठी राज्य शासनाने १२ लाख रुपये भरणे अपेक्षित आहे. ते १२ लाख रुपये का भरले जात नाहीत, त्याचे उत्तर सत्ताधारी शिवसेनेने दिले तर लोकांनाही कळेल की या कामात कोण खोडं घालत आहे. या कामासाठी लाख सोडा काही कोटी रुपये लागणार आहेत, याची कल्पना आमदार वैभव नाईक यांनाही आहे. पण हा निधी हे सरकार तळाशिल वासियांसाठी उपलब्ध करू शकत नाही. किंबहुना एवढे पैसे देण्याची यांची मानसिकता नाही. म्हणूनच हे १२ लाख रुपये भरायलाही टाळाटाळ करत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांचे आश्वासन हवेत विरले म्हणणारे बोलताना किमान थोडा अभ्यास करून बोलले असते तर तोंडावर पडण्याची वेळ आली नसती. जो पर्यंत क्रोसेक्शन सर्व्हे होत नाही, तो पर्यंत मोठ्या प्रमाणात निधी मिळणार नाही. शिवसेनेने तात्पुरत्ता पर्याय काढून आणि २५/३० लाख देऊन काहीही होणार नाही. तळाशिल, देवबाग, तारकर्ली येथील ठोस कामाची कृती केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच नेहमी किनारपट्टीच्या लोकांच्या संरक्षणासाठी धावून आलेले आहेत. याची जाण लोकांना आहे. तेव्हा तुम्ही त्याची काळजी आहे असं भासवू नका. माजी खासदार निलेश राणे हे पूर्ण मालवण किनारपट्टी सुरक्षित रहावी या साठी प्रयत्नशील आहेत. लवकरच त्याची कृती दिसेल. आमचे मित्र जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांना तळाशिल स्मशानभूमी रस्त्यासाठी १० लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन बरीच वर्षे झालीत. त्याचं काय झालं ते विचारून घ्यावे आणि तळाशिल वासियांना पण सांगावे असा उपरोधिक टोला धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.