… तर महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठतील ; हरी खोबरेकरांचा इशारा
कुडाळ मधील शिवसेनेचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली
वाघाच्या डरकाळीनंतर जिल्ह्यात दोन दिवस अनेकांची “कोल्हेकुई” सुरु झाल्याचा टोला
मालवण | कुणाल मांजरेकर
आ. वैभव नाईक यांच्यावरील सुदाबुद्धीच्या नोटीसी विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे वाघाने डरकाळी फोडल्यानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. मात्र आ. भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यांच्या घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ह्या हल्ल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या कडून निषेध करण्यात येत असून आ. जाधव यांच्या केसाला धक्का लागला तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठतील, असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.
मालवण मधील शिवसेना शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपातालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, नरेश हुले, अन्वय प्रभू, प्रसाद आडवलकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी वायफळ बडबड करू नये. टिका सहन करायची ताकद नसेल तर दुसऱ्यांवर टीका करू नये. भाजपा नेत्यांकडून भास्कर जाधव यांची लायकी काढली जात आहे. प्रत्यक्षात आ. जाधव यांना विधिमंडळात उत्कृष्ट वक्ता म्हणून बहुमान मिळाला आहे. हा बहुमान विकत घेता येत नाही, त्यासाठी मतदार संघातील प्रश्न मांडावे लागतात. तुमच्या नेत्याला एकदा तरी असा बहुमान मिळाला आहे का ? याचा विचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावा.
उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुमच्या नेत्यांची पात्रता आहे का ?
आ. भास्कर जाधव यांची राणेंवर बोलण्याची पात्रता नाही, असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. तर मग देशातील टॉप ५ मध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर सातत्याने गरळ ओकणाऱ्या तुमच्या नेत्यांची पात्रता आहे का ? तुमच्या नेत्यांच्या तोंडाला कुलपे लावा आणि नंतर आ. भास्कर जाधव यांना सल्ले द्या, असे सांगून तुमचे नेते केंद्रात आहेत. वाढती महागाई कमी करणे, रुपयाचा घसरत असलेला दर स्थिर ठेवणे, देशाचा जिडीपी कसा वाढेल, यासाठी त्यांनी केंद्र शासन स्तरावर प्रयत्न करावेत, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे हरी खोबरेकर म्हणाले.