भास्कर जाधव … लायकी, योग्यता आणि मर्यादा पडताळून राणेसाहेबांवर बोला !
सुदेश आचरेकरांचा हल्लाबोल ; राणेसाहेब कोकणचे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व
शिल्लक सेनेत कोकणात नेता शिल्लक न राहिल्याने भविष्यातील मंत्री पदासाठी जाधवांकडून राणे कुटुंबावर गरळ
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना संपूर्ण कोकणचा कायापालट केला आहे. कोकणाला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच येथील जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा निर्माण झाला आहे. भास्कर जाधव याच्या सारख्या दळभद्री माणसाच्या बेताल वक्तव्यामुळे हे प्रेम कमी होणार नाही. गरीबीत जन्म घेतलेल्या राणेसाहेबानी मेहनत आणि स्वकर्तुत्वाच्या बळावर आज राजकीय जीवनात यश मिळवले आहे. राणेसाहेब आज भाजपात कार्यरत आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या कोकणातील निवडणुकांमध्ये आपली डाळ शिजणार नाही, हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कळून चुकले आहे. राणेसाहेब कोकणचे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी स्वतःची लायकी, योग्यता आणि मर्यादा पडताळून राणेसाहेबांवर बोलावे. आज शिंदे गटाच्या बंडाळी नंतर शिल्लक सेनेत नेता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे गटाची सत्ता आल्यास स्वतःला मंत्री पद मिळावे, यासाठीच भास्कर जाधव यांच्याकडून राणे कुटुंबांवर गरळ ओकली जात आहे. राणे कुटुंब आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.
मालवण भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मालवण भाजप कार्यालय येथे सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, मोहन वराडकर, आबा हडकर, अभय कदम, ललित चव्हाण, राजू बिडये, प्रमोद करलकर, महेश सारंग, विजय चव्हाण, पंकज पेडणेकर, आपा मोरजकर, विनायक मोरजकर, दादा वाघ, सुनील बागवे, विलास मुणगेकर, भाई मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, भास्कर जाधव यांचे शिवसेनेत अस्तित्व नाही. आणि शिवसेनेचे कोकणात अस्तित्व राहिले नाही. सर्वत्र ठाकरेसेना रसातळाला गेली आहे. शिवसेनेतील दिग्गज आमदारांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसेनेला नेतृत्व व नेता राहिलेला नाही. म्हणूनच आपल्याशिवाय कोकणात एकही नेता नाही हे दाखविण्यासाठी आणि भविष्यात पदाच्या आशेने ठाकरेंना खुश करण्यासाठी भास्कर जाधव राणे कुटुंबावर टीका करत आहेत. जाधव यांना चिपळूण शिवाय कोणी ओळखत नाही. म्हणूनच आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सिंधुदुर्गात येऊन राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा आटापिटा जाधव करत आहेत. राजकारणात आपले पद काय, आपली राजकीय उंची किती आपण बोलतो काय हे जाधव यांनी पडताळून पाहावे असाही सूचक टोला आचरेकर यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणसह राज्याचे नेते आहेत. तळकोकणचे ते भाग्यविधाते आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करताना पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा राणेंनी निर्माण केल्या. राणेंबद्दल घराघरात आपुलकी आहे. हे नतभ्रष्ट भास्कर जाधव यांना समजणारे नाही. जाधव यांनी स्वतःचा पूर्व इतिहास तपासून पहावा. जाधव यांनी दहशतवाद दहशतवाद असे बोंबटून दोन वेळा निवडणूक जिंकली. करोडोंची प्रॉपर्टी जमवली. मात्र राणेंवर टीका करून निवडणूक जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी सत्तास्थाने भाजपकडे आहेत, जिल्हा बँकही भाजपकडे आहे याचे शल्य जाधव यांच्यासह शिल्लक सेनेला आहे. यापुढेही सर्व सत्ता स्थाने भाजपकडे असतील हे जाधव यांनी लक्षात ठेवावे, कोकण भाजपमय होईल याची भीती जाधव यांना असून भाजपवर दबाव टाकण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे अशी टीकाही सुदेश आचरेकर यांनी केली.
मोर्चा काढून करोडोंची प्रॉपर्टी दडपण्याचा कोणी प्रयत्न करू नये. यातून सुटका नाही हे मोर्चा काढणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. प्रशासनाला हाताशी धरून ठेकेदारी करण्याचे दिवस संपले. असाही टोला आचरेकर यांनी आम. वैभव नाईक यांना लगावला.