अल्पवयीन युवतीच्या मृत्युमुळे खळबळ ; वडाचापाट येथील घटना

गळफास घेतेलेल्या स्थितीत मृतदेह ; आजोबा आणि बहिणीकडून संशय व्यक्त

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट ; युवतीचा मोबाईल तपासासाठी ताब्यात

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कु. वैष्णवी प्रशांत गुरव (वय – १७ वर्षे १० महिने, रा. आंगणेवाडी) असे मृत युवतीचे नाव आहे. ही मुलगी वडाचा पाट येथील स्वाती इंद्रनील नारिंग्रेकर यांच्याकडे गेले दहा महिने वास्तव्यास होती. त्यांच्याच घरात कु. वैष्णवीचा मृतदेह मिळून आला. दरम्यान, या मृत्युबाबत तीचे आजोबा जयप्रकाश सदाशिव आंगणे आणि बहीण कु. चित्रा प्रशांत गुरव यांनी संशय व्यक्त करीत सखोल तपासाची मागणी केली आहे.

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील जयप्रकाश सदाशिव आंगणे यांची नात कु. वैष्णवी प्रशांत गुरव ही डिसेंबर २०२१ पासून वडाचा पाट येथील स्वाती इंद्रनील नारिंग्रेकर यांच्या घरी राहायला होती. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नारिंग्रेकर यांच्या राहत्या घरात तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत मसुरे पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिल्यानंतर तिचा मृतदेह खाली उतरण्यात आला. तिच्या आजोबा आणि बहिणीला मागाहून या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री शवविच्छेदन सुरु होते.

डीवायएसपी विनोद कांबळे यांची घटनास्थळी भेट

या घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. तसेच पोलीस निरीक्षक विजय यादव, हेड कॉ. हेमंत पेडणेकर, विवेक फरांदे, महिला पोलीस नमिता ओरसकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत जयप्रकाश सदाशिव आंगणे यांनी
मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली असून याबाबत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

वैष्णवीच्या मृत्युबाबत संशय व्यक्त !

कु. वैष्णवी हीच्या मृत्युबाबत तीचे आजोबा जयप्रकाश सदाशिव आंगणे आणि बहीण कु. चित्रा प्रशांत गुरव यांनी संशय व्यक्त केला आहे. वैष्णवी हिला वडाचापाट येथे काहीतरी त्रास सुरु होता. याबाबत ती फोन वरून सांगत होती. काल रात्री देखील तीने घरात काहीतरी वाद झाल्याचे सांगून उद्या घरी आंगणेवाडीला येते, असे बहिणीला सांगितले होते. मात्र आज अचानक तीने गळफास लावून घेतल्याचे सांगितले गेले. तिने खरंच आत्महत्या केली का ? आणि केली तर का केली ? याबाबत सखोल तपास होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आजोबा आणि बहिणीने व्यक्त केली आहे.

वैष्णवीच्या मृत्युमुळे अनेकांना धक्का

वैष्णवी ही हुशार मुलगी होती. तिचा स्वभाव देखील सर्वांसोबत मिळून मिसळून चालणारा होता. अलीकडे तीने वैयक्तिक कारणामुळे शाळा सोडून वडाचा पाट येथे ती नारिंग्रेकर यांच्या घरी राहायला होती. तिच्या आकस्मिक मृत्युमुळे सर्वांना धक्का बसला आहे. तिच्या मृत्युमागील कारण बाहेर येण्याची आवश्यकता स्थानिक ग्रामस्थानी व्यक्त केली.

वैष्णवीचा मोबाईल तपासासाठी ताब्यात

वैष्णवी हीच्या मृत्युबाबत सर्व बाजूंनी तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरिक्षक विजय यादव यांनी दिली आहे. तपासासाठी तिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!