शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला जात असताना शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यापर्यंत चौकशीचे लोण येऊन ठेपले आहे. रत्नागिरी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आ. वैभव नाईक यांची शुक्रवारी तासभर चौकशी करण्यात आली. कणकवली येथील शासकीय विश्राम गृहावर ही चौकशी झाली असून येत्या 12 रत्नागिरी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी लहान मालमत्तेच्या विवरणासह उपस्थित राहण्यासंदर्भातही श्री. नाईक यांना पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाई मुळे सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करण्याची ग्वाही आ. नाईक यांनी देऊन कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा कणकवलीत दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी आमदार नाईक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर श्री. नाईक दाखल झाले. या ठिकाणी त्यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान आ. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो. त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार आपण शासकीय विश्रामगृहावर दाखल होत त्यांना आवश्यक माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी मागितलेली इतर माहिती व विवरण पत्रे त्यांना सादर करण्यात येतील. हा प्रकार म्हणजे दबावतंत्राचा प्रकार आहे. गृहखात्याच्या दबावाखाली हा प्रकार सुरू असून असे कितीही प्रकार केले तरी आम्ही त्याला भीक घालत नाही, असे श्री नाईक यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची इडी, सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार नाईक यांची एसीबी मार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!