आणखी एका शिवसेना नेत्याच्या ५ शिक्षण संस्थांवर “ईडी” चा छापा !
मुंबई : शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावल्याने राजकीय वातावरण तापलं असतानाच आता आणखी एका शिवसेना नेत्याच्या शिक्षण संस्थांवर ईडीने छापा टाकला आहे. भावना गवळी असं या महिला नेत्याचं नाव असून त्या वाशीमच्या शिवसेना खासदार आहेत.
बालाजी पार्टीकल कारखान्याच्या घोटाळा प्रकरणी ही कारवाई झाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतचे आरोप केले होते. या पाचही शिक्षण संस्थांमधील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वाशिम च्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी रुपये चोरीला गेल्याच्या तक्रारीनंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. खासदार भावना गवळी यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशीमचा दौरा केला होता. त्यावेळी ते बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी जात असताना भडकलेल्या भावना गवळी समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाई फेक केली होती.