भाजपची यात्रा झाली; आता सिंधुदुर्गात शिवसेनेचं आंदोलन !
जिल्ह्यातील शिवसेना रस्त्यावर उतरणार : मालवण मधील पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : कोकणात नुकतीच भाजपची जन आशीर्वाद यात्रा पार पडली. यावेळी भाजप आणि शिवसेनेत काही ठिकाणी जोरदार ठसन पाहायला मिळाली. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे राजकिय राडा टळला. मात्र आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील शिवसेना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. वाढत्या महागाई वरून केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन होणार असल्याची माहिती शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या कारभारामुळे सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढलेले दर, रेल्वेचे खासगीकरण, बीएसएनएलची विस्कळीत झालेली सेवा याविरोधात हे आंदोलन उभारण्यात येणार आहे. जनतेच्या या मागण्या तडीस लागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिवसेना यावेळी रस्त्यावर उतरणार असल्याचे हरी खोबरेकर यांनी सांगितले.