राणे पिता-पुत्रांना “त्या” १० कोटींचा विसर ; शिवसेनेची मात्र आश्वासनपूर्ती
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; आचऱ्यातील जनआशीर्वाद यात्रेतही चकार शब्द नाही
कुणाल मांजरेकर
मालवण : तळाशीलमध्ये बंधाऱ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण छेडल्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जवळपास १ कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी याठिकाणी जाऊन आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना शिवीगाळ करत शिवसेनेने दिलेला निधी तुटपुंजा असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दहा दिवसांत १० कोटी रुपये आणू, अशी ग्वाही दिली. मात्र या घोषणेला १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी हे पैसे आले नाहीत. त्या उलट शिवसेनेने दिलेल्या शब्दाप्रमाणे बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आचऱ्यात राणेंची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली. यावेळी राणेंनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मात्र “त्या” दहा कोटींबाबत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे माजी खासदारांनी जाहीर केलेले दहा कोटी हवेत विरले की काय ? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
येथील शिवसेनेच्या कार्यालयात श्री. खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तळाशील बंधाऱ्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दहा दिवसांत १० कोटींचा निधी आणण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याबद्दल टीका केली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, सन्मेश परब, सेजल परब, पंकज सादये, अनंत पाटकर, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, पूनम चव्हाण, यशवंत गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.