श्रद्धांजली सभेत भाऊंच्या आठवणींना उजाळा !
शिवसेना देवली विभागाच्या वतीने दिवंगत उपसरपंच भाऊ चव्हाण यांच्या शोकसभेचे आयोजन
मालवण : तालुक्यातील देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कृष्णा ऊर्फ भाऊ माधवराव चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना श्रदांजली वाहण्याकरिता शिवसेना देवबाग विभाग यांच्या वतीने देवली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थितांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
भाऊ चव्हाण हे देवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. ते गेले काही दिवस आजारी होते. यातच नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवली गावावर शोककळा पसरली आहे. भाऊ चव्हाण यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध व देवली गावातील तसेच शिवसैनिकांवर निर्माण झालेले भाऊ चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे नात्याचा उलगडा या शोकसभेत विविध मान्यवरांनी केला. भाऊ चव्हाण यांना आदरांजली अर्पण करत असताना जुन्या आठवणींची कवाडे मान्यवरांनी उलगडली. या शोकसभेला शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष भाई गोवेकर यांनी उपस्थित राहत कृष्णा ऊर्फ भाऊ माधवराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी देवली ग्रामपंचायत सरपंच गायत्री चव्हाण, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, भगवान लुडबे, अतुल चव्हाण, सचिन मालवणकर, रुपेश आळवे, गोळवण येथील भाऊ चव्हाण, मुरारी चव्हाण तसेच शिवसैनिक आणि देवली ग्रामस्थ उपस्थित होते.