इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार !

केंद्रीयमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव ; पालिकेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारला सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरी रूपा मिश्रा या देखील उपस्थित होत्या. स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग देशातील एकूण 4300 शहरांमध्ये राबविण्यात आली होती. या स्पर्धेची सुरुवात कचरामुक्त समुद्रकिनारे, डोंगर आणि पर्यटन स्थळांसाठी युवकांच्या रॅलीने करण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी झाली होती. या स्पर्धेचा मूळ उद्देश्य कचरा मुक्त शहर ही संकल्पना व्यापकतेने राबविणे, देशातील पर्यटन शहरांना अधिक सुंदर व स्वच्छ बनविणे आणि एकंदरीत शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे हा होता.

मालवण हे ऐतिहासिक व पर्यटन दृष्टया महत्वाचे व प्रसिद्ध शहर आहे. मालवण नगरपरिषदेचा केंद्रशासना कडून झालेला हा सन्मान मालवण, तारकर्ली, देवबाग यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे.

या स्पर्धेअंतर्गत मालवण नगर परिषदेकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन एकाच दिवसात शहरातील एकूण 8.5 किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला होता. शहरातील शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस, विविध सेवाभावी संस्था, पत्रकार, नागरिक, शहरातील सरकारी कार्यालये सहभागी झाले होते. या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहराचा संघ “मालवण वॉरियर्स” या नावाने नोंद केला होता. नगरपरिषदेने एक पर्यटन शहर असल्याकारणाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेली जनजागृती, या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्था, नागरिक यांचा सहभाग, या कार्यक्रमामुळे शहर स्वच्छतेवर होणारा सकारात्मक परिणाम, शहरातील नागरिकांची स्वच्छतेविषयीची जागरूकता, या कार्यक्रमास मिळालेली प्रसिद्धी व महत्वाचे म्हणजे नगर परिषदेकडून केंद्र शासनाला डोक्युमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रेझेंटेशन या सर्वाचे परीक्षण करण्यात आले होते.

मालवण वासीयांच्या स्वच्छता विषयक सजगतेमुळे हा सन्मान : मुख्याधिकारी संतोष जिरगे

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, केंद्रीयमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक समीर उन्हाळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानची संपूर्ण टीम, कोकण विभाग आयुक्त, उपायुक्त, पालिकेचे माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी, मत्स्य व्यावसायिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, शहरवासीयांचा सहभाग, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या मेहनातीमुळे मालवण शहर या बक्षिसास पात्र ठरले, अशी प्रतिक्रिया नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाकडून झालेल्या या सन्मानामूळे आपली सर्वांची जबाबदारी अजून वाढलेली आहे. यावर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सुद्धा मालवण वासीयांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून या प्रयत्नात कचरा मुक्त शहर करण्यासाठी आणि कचरा विरुद्ध लढण्यासाठी सर्व मालवण वासीयांनी तयार रहावे व मालवण शहराला एक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर नावारूपास येण्यास सज्ज रहावे, असे आवाहन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!