मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित
महेश कांदळगावकर यांची शिष्टाई ; उद्यापासून कामगार कामावर हजर होणार
मालवण : मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून पुकारलेले काम बंद आंदोलन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर मागे घेतले आहे. श्री. कांदळगावकर यांच्या उपस्थितीत सोमवारी नगरपालिकेत ठेकेदार आणि कंत्राटी कामगारांची पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर कामगारांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या असून काही प्रश्नांवर प्रशासन पातळीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मंगळवारपासून कामावर परतण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
ठेकेदाराकडून अनियमित स्वरूपात मिळणारा पगार, हँड ग्लोव्हज व अन्य सुरक्षा साहित्य न मिळणे यासह अन्य मागण्यांसाठी मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असताना प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते. या पार्श्वभूमीवर कामबंद पुकारलेल्या १५ कर्मचाऱ्यांनी सोमवारी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर महेश कांदळगावकर सर्व कर्मचारी यांच्यासह नगरपालिकेत दाखल झाले. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी कामगार प्रश्नी तोडगा काढणे आवश्यक असल्याने पालिका कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांना बोलावून घेत कामगारांच्या मागण्यांबाबत कामगारांसमोर चर्चा करण्यात आली.
कामगारांचा मागील थकीत पगार तात्काळ देण्यात यावा. हॅण्डग्लोज, बूट, कोट व अन्य साहित्य कामगारांना तात्काळ मिळावे. भरणा होणाऱ्या पीएफची माहिती कामगारांना मोबाईलवर मेसेज स्वरूपात मिळावी. यासह अन्य समस्या प्रशासन स्तरावर सोडवाव्यात. या कामगारांच्या मागण्या कांदळगावकर यांनी मांडल्या. त्यानुसार ठेकेदाराने कामगारांचा मागील थकीत पगार दोन दिवसात देण्याचे मान्य केले. कामगारांना बूट, कोट व अन्य सुरक्षा साहित्य तात्काळ देण्याचे मान्य केले. तर मागणीनुसार हॅण्डग्लोज देण्याचेही मान्य केले. सकारात्मक चर्चे नंतर कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन स्थगित करत मंगळवार पासून कामावर हजर होणार असल्याचे स्पष्ट केले. प्रशासन पातळीवरील मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले.