कंत्राटी वीज कामगारांना बाप्पा पावला ; निलेश राणेंची मध्यस्थी !

गणेश चतुर्थी निमित्ताने महिना पूर्ण होण्यापूर्वीच मानधन जमा ; ५५० कर्मचाऱ्यांना लाभ

सेवेतून कमी केलेले १० % कामगारही सेवेत पूर्ववत ; कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेने निलेश राणेंसह केंद्रीयमंत्री नारायण राणे, आ. नितेश राणेंचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांना गणपती बाप्पा पावला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कंत्राटी वीज कामगारांना महिना पूर्ण होण्यापूर्वीच पगार जमा करण्यात आला आहे. ५५० कामगारांना याचा लाभ मिळाला असून या कर्मचाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, महावितरण कंपनीने राज्यात १० % कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी केले होते. मात्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सर्व कामगारांना सेवेत पूर्ववत घेण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना यंदा बाप्पा पावला आहे.

गणेश चतुर्थी ह्या कोकणातील सर्वात मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी वीज कामगारांचा पगार होणे आवश्यक होते. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत, संदीप बांदेकर, आनंद लाड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर माजी खा. राणे यांनी ठेकेदाराशी केलेल्या चर्चेनंतर गणेश चतुर्थी निमित्ताने महिना पूर्ण होण्यापूर्वीच सर्व कामगारांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कामगारांच्या एकजुटीमुळे हा पगार झाला आहे. तसेच जिल्ह्यात दहा टक्के कामगार जे काढण्यात आले होते, ते कमी केलेले कामगार या जिल्ह्यात पुन्हा घेण्यात आले. हे देखील महाराष्ट्रात प्रथमच घडले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!