… अन् खचलेल्या “त्या” पूलावरून अवघ्या दोन दिवसांत वाहतूक सुरू !
माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ कार्यवाही
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील आडवण येथील ४० वर्षांपूर्वीचा पूल खचुन त्यात एक डंपर अडकला. हा डंपर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बाहेर काढला. मात्र या पुलाची तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी स्थानिक माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालिकेकडे केलेल्या यशस्वी पाठपुव्यामुळे अवघ्या दोन दिवसात या पुलाची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या कामासाठी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यासह पालिका प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.
आडवण येथे रस्त्यावरील एक छोटेसे पूल जुनाट बनल्याने त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. या पुलास ४० वर्षे झाली असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. यात दोन दिवसांपूर्वी या पुलावरून जाणारा एक डंपर पूल खचल्याने रुतला. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास येताच माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यासह संजय वराडकर, भाई गोवेकर, बंटी चव्हाण, अमित चव्हाण, संदिप साळगावकर, गणेश चव्हाण, दिपेश साळगावकर, चेतन हिंदळेकर, रवी चव्हाण, मंदार तांडेल, अभी चव्हाण, प्रशांत माडये, चेतन मालवणकर, राजन साळगावकर, गजानन साळगावकर, अनिल साळगावकर, बंटी साळगावकर, दत्तू साळगावकर, गुरुनाथ चव्हाण, हर्ष गोवेकर, किशोर पाटकर, नंदू साळगावकर, हरीश गावकर, अजित वराडकर, प्रसाद वराडकर, देवेंद्र साळगावकर यांनी पुलात खचलेला डंपर बाहेर काढण्यात यश मिळविले.
या पुलाच्या दुसऱ्या बाजूला स्थानिकांची काही घरे आहेत. पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शिवाय वाहतूकही बंद पडली. त्यामुळे स्थानिक माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालिका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या सूचनेनुसार बांधकामच्या अधिकारी सोनाली हळदणकर, राजा केरीपाळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर नागरिकांची होणारी गैरसोय तसेच गणेशोत्सव जवळ आल्याने पुलाचे काम तत्काळ करणे गरजेचे आहे हे जाणून अवघ्या दोन दिवसांत पुलाच्या ठिकाणी पाईप मोरी टाकून तात्पुरत्या स्वरूपात पुलाची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत झाला आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या या सहकार्याबद्दल श्री. लुडबे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.