एमआयटीएमच्या वतीने घेण्यात आलेल्या “मॉक सीईटी २०२२” मध्ये वेंगुर्लेचा अजिंक्य डिसोजा प्रथम
संजय घोडावतचा पियुष कुशे द्वितीय तर टोपीवालाचा चेतन वडार तृतीय
मालवण | कुणाल मांजरेकर
मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या मॉक सीईटी २०२२ मध्ये वेंगुर्ल्याच्या खर्डेकर कॉलेजचा विद्यार्थी अजिंक्य अँथोनी डिसोजा याने प्रथम क्रमांक मिळवला. तर संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरच्या पियुष सागर कुशे याने द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल मालवणच्या चेतन गंगाराम वडार याने तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना एमआयटीएमच्या वतीने रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली.
एमआयटीएमच्या वतीने दरवर्षी MHT- CET साठी सराव परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा महिनाभराच्या कालावधीत चार टप्प्यात घेण्यात आली. अंतिम मॉक टेस्ट २२ जुलैला घेण्यात आली. या जिल्ह्यातील ४०० विद्यार्थी बसले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वत व प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी प्राचार्य सूर्यकांत नवले, संयोजक प्रो. सुकन्या सावंत यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा खूप फायदा घेता आला, असे मत पालकांनी व्यक्त केले.