… तर पितृ पंधरावड्यात महावितरणचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालणार !
राष्ट्रीय काँग्रेसचा मालवणात इशारा ; अन्याया विरोधात ग्राहक मंचाकडे जाण्याचाही विचार सुरू
मालवणात काँग्रेसकडून लाईट बिले जाळत वाढीव वीज बिलांचा निषेध
मालवण | कुणाल मांजरेकर
वाढीव वीज बिलांमुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात देखील जावळ आला आहे. वाढीव वीज बिलात मीटर रिडींग घेणाऱ्या कंपन्यांच्या देखील अनेक चुका दिसून येत असून त्यांच्या चुकांमुळे देखील ही बिले वाढलेली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून रिडींग घेणाऱ्या कंपनीला कोणत्याही प्रकारचा दंड झालेला दिसून येत नाही. वाढीव वीज बिलांमुळे अनेक ग्राहकांची बिले थकली असून आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकाच वीज कनेक्शन तोडण्यात आल्यास गणेशोत्सवानंतर या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी दोन दिवशीय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये वितरण कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास त्याबाबत येणाऱ्या तक्रारीनुसार अधिकारी व कंपनी विरोधात ग्राहक मंचाजवळ तक्रार करण्या बरोबरच गणेश चतुर्थीनंतरच्या पितृपंधरवड्यात वीज वितरणचे अधिकारी आणि या विभागाच्या मंत्र्यांच्या नावाने महावितरण कार्यालयाच्या आवारात श्राद्ध घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
इतर भारच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नागरिकांना वाढीव बिल देऊन लूट करत आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी वीज वितरण कार्यालय देऊळवाडा येथे वीज बिले जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, बाळु अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, युवक काँग्रेसचे गणेश पाडगावकर, अमृत राऊळ, पल्लवी तारी- खानोलकर, श्रेयस माणगांवकर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेडिस, योगेश्वर कुर्ले, केदार केळुसकर, मयूर तळगावकर, श्रीहरी खवणेकर, ऐश्वर्या काळसेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. “वीज युनिट दर कमी करा, नायतर खुर्च्या खाली करा…”, “या सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय…”, “थंड एसी मध्ये बसून सामान्य जनतेला घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो…”, “महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी नागरिकांची वाढीव बिल देऊन लूट करत आहे…” असे नारे यावेळी देण्यात आले. ज्या घरात एक ट्यूब व फॅन, मिक्सर आहे त्यांना पूर्वी १५० ते २०० रुपये बिल येत होतं, एखाद्या घरातील नागरिक बाहेर गेलेत अश्याना सुद्धा काही हजारामध्ये वाढीव बिल येऊ लागली आहेत. प्रामाणिक पणे सामान्य जनता बिल भरत असताना या विद्युत वितरणाच्या गलथान कारभारा मुळे लोकांना बिल भरताना घाम फुटत आहे, अशा शब्दात यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
महावितरणच्या चुकांमुळे मीटर मधून येणारा वीज प्रवाह वारंवार कमी जास्त प्रमाणात येत असून वाढीव लोड मुळे अनेक घरांमधील विद्युत उपकरणे देखील खराब झाली असून नागरिकांना वर्षाला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनी कोणत्याही प्रकारचे नुकसान भरून देत नाही. त्यात मीटर देखील जम्प होऊन याचा फटका नागरिकांना बसत आहे. महावितरण कार्यालयात गेलं असताना गोरगरीब जनतेला विनाकारण मीटर टेस्टिंग करण्यास सांगत असून त्यासाठी ३०० रुपयेच्या आसपास खर्च व चार चार वेळा वीज वितरण कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, याचा नाहक भुर्दंड नागरिकांना बसत आहे.
काही महिन्यांपूर्वी आम्ही वीज वितरण कार्यालय मालवणला याबाबत नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्या घरात येत असलेल्या प्रवाहातील अडचणी दूर करण्यास सांगितले होते व त्यासोबत नागरिकांच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते. असे असून आजही अधिकारी कोणत्याही प्रकारे नागरिकांना सहकार्य न करता घरोघरी जाऊन मीटर कट करत आहेत. याबाबत विचारणा करण्यास कार्यालयात गेलं असताना अधिकारी देखील जाग्यावर नसतात, त्यांना फोन केला तर तो लागत नाही आणि लागला तर तो उचलला जात नाही. त्यांच्या या बेजबाबदार वागण्याचा नागरिकांना त्रास का..? असा सवाल काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.