कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून सावरकरांच्या कार्याला उजाळा …!

पणदूर ग्रामपंचायतीच्या स्वराज्य महोत्सवाचा शानदार समारोप

ओरोस : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पणदूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्वराज्य महोत्सवाचा शानदार समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन पटावर आधारित कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाने या कार्यक्रमांची रंगत अधिकच वाढली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात  “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उत्साहात साजरा होत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” आणि १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “घरोघरी तिरंगा” मोहिम मोठ्या उत्साहात पणदूर गावात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात पार पडला होता.

गेले आठ दिवस राज्य सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे विविध उपक्रम आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात गावातील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज, खाजगी संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत हे कार्यक्रम यशस्वी केले. तसेच १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा अभिमानाने फडकवला. या सगळ्या कार्यक्रमांचा समारोप पणदूर हायस्कूलच्या सभागृहात एका वेगळ्या कार्यक्रमाच्या रूपाने करण्यात आला. यावेळी पिंगळी येथील सुप्रसिद्ध कळसूत्री बाहुल्यांचे कलाकार श्री शिवदास मसगे यांच्या “स्वतंत्रता के महात्मा स्वतंत्रवीर सावरकर” यांच्या जीवनावर आधारीत कळसूत्री  बाहुल्या आणि छाया बाहुल्या यांच्या अतिशय रोमहर्षक अशा सादरीकरणाने झाली. यावेळी उपस्थित सर्वच प्रेक्षक अतिशय भारावून गेले होते. यावेळी सरपंच दादा साईल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून गेले आठ दिवस नागरिकांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच आपल्यामध्ये असलेल्या देशभक्ती कायम ठेवत ठेवून स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक आणि नायक यांच्याबद्दल आपण नेहमीच आदर ठेवू अशी भावना व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायतीने राबवलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल सर्व ग्रामस्थांनी आणि विद्यार्थी वर्गाने आभार व्यक्त केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!