… तर मनसैनिक नाक्यानाक्यावर गाड्या अडवतील ; मनसेचा इशारा

वनविभागाची कारवाई मनसेच्या आंदोलनाचे ‘फलित’ : अमित इब्रामपूरकर

कुणाल मांजरेकर
मालवण : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवैध वृक्षतोड करुन लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मुद्देमालासहीत पकडून वनविभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहे. हे मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे फलित आहे. परंतु वनविभागाची ही कारवाई किरकोळ स्वरुपाची असुन याहीपेक्षा मोठी कारवाई करावी अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या अडवतील. याला प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल असा इशारा मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


पत्रकात म्हटले आहे की, मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली २३ आॕगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अवैध वृक्षतोड थांबवावी, जिल्ह्यातील सर्व खाण प्रकल्प बंद व्हावेत, इंधन दरवाढ, अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाई करावी व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले होते.


देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणुन सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. निसर्ग सौंदर्याने असलेल्या सिंधुदुर्गात अवैध वृक्षतोड गेले अनेक वर्षे सुरूच असून निवडून दिलेले जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी या वृक्षतोडीबाबत मूग गिळून गप्प आहेत. मनसेने पर्यावरण दिनी आंदोलनाची हाक दिली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची झालेली हानी पाहता वनविभागाने केलेली कारवाई किरकोळ स्वरुपाची आहे. याही पेक्षा मोठी कारवाई करावी.केवळ दोन,तीन ठिकाणी कारवाई करुन दिखावूपणा चालणार नाही.
अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या थांबतील व मनसेच्या पद्धतीने कारवाई करतील. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल, असे इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!