उत्सुकता संपली ; बहुचर्चित “सोन्याचा नारळ चषक” नारळ लढवण्याची स्पर्धेचे मंगळवारी आयोजन

भरड दत्त मंदिरात होणार स्पर्धा ; विजेत्या महिलांवर सोन्या- चांदीच्या बक्षीसांचा वर्षाव होणार

स्पर्धा आयोजक शिल्पा यतीन खोत यांची माहिती ; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने गेली सात वर्षे आयोजित केली जाणारी सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी सर्वात मोठी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता भरड दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.

नारळी पौर्णिमा निमित्ताने होणारी ही स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने भरड दत्तमंदिर येथील पटांगणात स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या गजरात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आयोजकांच्या वतीने बैठक घेऊन स्पर्धेची तारीख व जागा निश्चित करण्यात आली.

अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या चांदी पासून बनवलेला आकर्षक नारळ, सोन्याची नथ, चांदीचे दिवे, पैठणी असा लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती आयोजक शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी महिला नारळ लढवणे स्पर्धा अशी ओळखप्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला स्पर्धकांची नाव नोंदणी होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील पाच महिलांचा प्रातिनिधिक सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणीसाठी ९३२६४७७७०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिल्पा खोत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!