मंदार लुडबेंच्या इशाऱ्यानंतर सा. बां. विभागाला जाग ; “त्या” रस्त्याच्या दुरुस्तीचं पत्र
अधिकाऱ्यांकडून ठेकेदारासमवेत रस्त्याची पाहणी ; मंदार लुडबेंचीही उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण – तारकर्ली – देवबाग मार्गावरील वायरी शिवाजी पुतळा ते माणगांवकर काजू फॅक्टरी पर्यंतचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून तातडीने हे काम सुरू न केल्यास १५ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजयुमोचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मंदार लुडबे यांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी या ठिकाणी भेट देऊन या मार्गावरील दोन्ही कामे तातडीने सुरू करण्याचे लेखी पत्र श्री. लुडबे यांना दिले आहे.
वायरी – तारकर्ली- देवबाग रस्ता डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण करणे हे काम मंजुर आहे. यातील ९० % काम पूर्ण झाले असून वायरी शिवाजी पुतळा ते माणगावकर काजू फॅक्टरी पर्यंतचा रस्ता ठेकेदाराने अपूर्ण ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे या भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सदरील ठेकेदाराला ग्रामस्थांना त्रास द्यायचा असल्यामुळे तो हे काम अर्धवट ठेवून गेला आहे. त्याने काम तातडीने सुरू न केल्यास १५ ऑगस्टला याठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा मंदार लुडबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यानी ठेकेदारासमवेत याठिकाणी भेट दिली. यावेळी मंदार लुडबे देखील उपस्थित होते. या पाहणी नंतर सदरील काम तातडीने सुरू करण्याचे लेखी पत्र श्री. लुडबे याना दिले आहे. तारकर्ली मधील रांजेश्वर पुलाकडील जोडरस्ते देखील अपूर्ण आहेत, हे काम देखील तातडीने सुरू करण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.