मालवणात उद्या महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा ; विशेष प्राविण्य म्हणून मिळणार ९ ग्रॅम सोन्याचा हार ..!
मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजन ; माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांची उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणच्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमे निमित्ताने मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या वतीने गुरुवारी ११ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्याची नथ आणि पैठणी दिली जाणार असून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या स्पर्धकाला ९ ग्रॅम सोन्याचा हार मिळणार आहे. याशिवाय अन्य विजेत्या स्पर्धकांवर चांदीचा हार, कंबरपट्टा, मोबाईल अशा बक्षिसांची उधळण करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेत्या, माजी आमदार हुस्नबानू खलीपे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी महिलांना पैठणी सोबत सोन्या, चांदीची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून आकर्षक असा ९ ग्रॅम सोन्याचा हार (नेकलेस) जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्याशिवाय स्पर्धेमधील प्रथम क्रमांकांस पैठणी, सोन्याची नथ सोबत १० लाखाचा विमा, द्वितीय क्रमांकास पैठणी व चांदीची पैंजण सोबत १० लाखाचा विमा, तृतीय क्रमांकासाठी पैठणी व चांदीची पैंजण सोबत १० लाखाचा विमा आणि चतुर्थ क्रमांकासाठी पैठणी, मोबाईल सोबत १० लाखाचा विमा अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागा बद्दल लकी ड्रॉ द्वारे देखील हक्काचे बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून मोफत मिळणार आहेत. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या व स्पर्धा पाहणाऱ्या उपस्थित नागरिकांसाठी कुपन देण्यात येणार असून यातुन एक कुपन लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल. त्या विजेत्यास आकर्षक बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा देण्यात येणार आहे. स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून सोन्याचा हार जिंकण्याबाबत असलेल्या अटी शर्ती स्पर्धेदरम्यान सांगण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी आमदार हुस्नबानू खलीपे उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार खलीपे यांनी मालवण शहरात जुनी भरड शाळा या ठिकाणी बालपणी शिक्षण घेतले असून शहरात त्यांचं बालपण गेलं असून आज पुन्हा या शहरात त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येत आहेत, तरी या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंद मोंडकर यांनी केले आहे.