सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
२७ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क ; महिलांचा लक्षणीय सहभाग
मालवण : ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत येथील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २७ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
शिबिराचे उदघाटन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, तहसीलदार अजय पाटणे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महेश जावकर यांच्यासह जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
वडिलांच्या निधनाच्या दुःखातही रक्तदानाचे कर्तव्य पार
शहरातील अनिकेत फाटक या युवकाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब शोकसागरात असतानाही अनिकेत याने स्वतः या रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदानाचे कर्तव्य निभावलं. सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं कौतुक करण्यात आलं. तसेच रेवंडी येथील सायली कांबळी या दाम्पत्याने आपल्या मुलासह येऊन रक्तदानाचे पवित्र कर्तृत्व बजावलं. या रक्तदान शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.