कुपेरीच्या घाटीत भीषण अपघात : ट्रकची झाडाला धडक बसून चालकाचा जागीच मृत्यू
चालकाचा मृतदेह केबिनमध्ये अडकलेल्या स्थितीत ; बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू
मालवण : मालवण चौके येथून कर्नाटक येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक चौके कसाल मार्गावरील कुपेरीच्या घाटीत उतारावर भल्या मोठ्या झाडावर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक अर्जुन ईश्वर नाईकप्पागोल (वय ३०, रा. नायकरओनी यरगनवी ता. सौदती बेळगाव) याचा जागीच मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या अन्य वाहनाला बाजू देण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर चालकाचा मृतदेह बराच वेळ आतमध्ये अडकून होता. त्याला बाहेर काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा दर्शनी भाग व झाड यांच्यात ड्रायव्हर अडकून पडला होता. अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून पत्रा लागून त्याचा कान फाटला आहे. कुणकावळे सरपंच मंदार वराडकर आणि वाहतुक पोलीस नितीन शेटये यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. कट्टा दूरक्षेत्र पोलीसांसह वाहतूक पोलीस डी. एस. तारी, एम. बी. देऊलकर, नितीन शेट्ये, ए. एन. गायतोंडे, पी. पी. ओरसकर तसेच चिरेखाण व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधीनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. ट्रक मधील चिरे बाजूला करून ट्रक बाजूला करून आत अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातात ट्रकची चेस सुटून सुमारे दोन फूट पुढे गेल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली.